एखादे इमोशनल गाणे असो किंवा पार्टीचे साँग असो, मिका सिंह आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्यांचा जन्म १० जून १९७७ रोजी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे झाला. आपल्या व्यावसायिक आयुष्यात अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या मिका सिंहचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादांच्या भोवऱ्यात अडकलेले असते. कधी त्याने सार्वजनिकरित्या राखी सावंतचे चुंबन घेतलेय, तर कधी वयाच्या ४५व्या वर्षी त्याने टेलिव्हिजनवरच आपलं स्वयंवर रचलं. त्याच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी जाणून घेऊया या गायकाचे नाव आतापर्यंत कोणत्या वादांशी जोडले गेले आहे.
मिका सिंह आणि राखी सावंत यांच्यातील वैर अनेक दिवसांपासून सुरू आहे. २००६मध्ये मिका सिंहने त्याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. यावेळी त्याने मीडियासमोर ड्रामा क्वीन राखी सावंतचे खुलेआम चुंबन घेतले होते. यावरून राखी सावंतने चांगलाच गोंधळ घातला होता. या घटनेनंतर 'ए भाई तुने पप्पी ली' हे गाणेही तयार झाले. मात्र, काही वर्षांपूर्वी मिका आणि राखी यांच्यातील वाद मिटला.
मिका सिंह आणि वाद हे समीकरण तसे जुनेच आहे. एका संगीत कार्यक्रमादरम्यान गायकाने एका डॉक्टरला थप्पड मारली होती, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. संगीत कार्यक्रमादरम्यान बोलत असताना मिकाने अचानक त्याला थप्पड मारली होती. रिपोर्ट्सनुसार, मिकाने डॉक्टरला एवढ्या जोरात चापट मारली की, त्याच्या कानाचा पडदाही फुटला. या प्रकरणी अनेक डॉक्टर गायकाच्या विरोधात उभे राहिले होते.
२०१६मध्ये आणखी एका मॉडेलने मिका सिंहवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र, नंतर मिका सिंहने ती मॉडेल पैसे उकळण्यासाठी असे खोटे आरोप करत आहे, म्हणत तिच्या विरुद्ध काउंटर केस दाखल केली.
मिका सिंह नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकतो. २०१३मध्ये परदेशातून परतत असताना विमानतळ प्राधिकरणाने त्याला विदेशी चलनासह अटक केली होती. गायक बँकॉकहून परतत असताना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्यांना १२,००० डॉलर आणि ३ लाख रुपये रोख सापडले.
२० वर्षात १५०हून अधिक रिलेशनशिप नाकारणाऱ्या मिका सिंहने लाइफ पार्टनर निवडण्यासाठी टीव्हीची मदत घेतली होती. त्याने टीव्ही शोमध्ये एक स्वयंवर आयोजित केले होते, ज्यामध्ये विविध शहरातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. तथापि, त्याने आपली वधू म्हणून नॅशनल टेलिव्हिजनवरील कॅलेंडर गर्ल अभिनेत्री आकांक्षा पुरीची निवड केली. दोघांनी नॅशनल टीव्हीवर एकमेकांना हार घातला. पण, लग्न केले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल करण्यात आले.