Happy Birthday Mahesh Kothare: मराठी मनोरंजन विश्वाचे लाडके ‘इन्स्पेक्टर’ म्हणजेच अभिनेते महेश कोठारे यांचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस आहे. केवळ अभिनेते म्हणूनच नाही तर, त्यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही मनोरंजन विश्व गाजवले. महेश कोठारे यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली होती. अर्थात अभिनयाचं बाळकडू त्यांना आपले आई-वडील जेनमा आणि अंबर कोठारे यांच्याकडूनच मिळालं होतं. महेश कोठारे यांचे आई-वडील देखील नाट्यक्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्यामुळे महेश कोठारेंना देखील अभिनयाची गोडी लागली होती.
महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांना पहिला चित्रपट कसा मिळाला या मागे देखील एक भन्नाट किस्सा आहे. ‘छोटा जवान’ या चित्रपटात महेश कोठारे पहिल्यांदा झळकले होते. हा चित्रपट त्यांना अगदी योगायोगानेच मिळाला होता. महेश कोठारे यांचे वडील नाटकांच्या निमित्ताने अनेकांच्या भेटीसाठी जायचे, असेच एके दिवशी एका नाटकाच्या कामासाठी अंबर कोठारे गजानन जहागीरदार यांच्याकडे जायला निघाले होते. तेव्हा छोट्या महेश यांनी देखील सोबत जाण्याचा हट्ट धरला. अखेर बाबांना देखील त्यांच्या लेकाचा हट्ट पुरवावा लागला.
अंबर कोठारे, गजानन जहागीरदार यांच्या भेटीला निघताना महेश यांना सोबत घेऊनच निघाले. छोट्याशा, गोंडस आणि नटखट महेश कोठारे यांना पाहून गजानन जहागीरदार यांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले की, ‘मला माझा छोटा जवान सापडला.’ अशा प्रकारे महेश कोठारे यांना ‘छोटा जवान’ हा चित्रपट मिळाला. त्यांचा हा चित्रपट चांगला चालला. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून काम केले. त्यांचे अनेक चित्रपट गाजले.
‘धुमधडाका’ या मराठी चित्रपटातून त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सगळ्याच क्षेत्रात मुशाफिरी केली. केवळ चित्रपटच नव्हे, तर आता महेश कोठारे मराठी मालिकांच्या निर्मितीत देखील आपले नाव गाजवत आहेत.