Happy Birthday Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात तिने यश मिळवले आहे. कियारा आज (३१ जुलै) तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. कियाराचा जन्म १९९२मध्ये मुंबईत झाला. कियाराचे वडील जगदीप अडवाणी हे मोठे उद्योगपती आहेत. त्याची आई जेनेव्हिव्ह जाफरी एक शिक्षिका आहे. तुम्हाला माहिती आहे का की, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कियाराचे नाव आलिया होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासोबतच तिने स्वतःचे नाव देखील बदलले. कियाराने २०१४मध्ये ‘फगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी तिने तिचे नाव आलियावरून बदलून कियारा केले. कियाराच्या पदार्पणाच्या वेळी आलिया भट्टने इंडस्ट्रीत स्वत:चे मोठे नाव कमावले होते.
सलमान खानच्या सांगण्यावरून कियाराने तिचे नाव बदलले आहे. एका मुलाखतीत कियाराने सांगितले होते की, ‘अंजाना अंजानी’ या चित्रपटातील प्रियांकाच्या पात्राचे नाव कियारा आहे. त्यामुळे ती खूप प्रभावित झाली होती. कियाराने आजही तिच्या सोशल मीडियावर तिचे नाव आलिया असे लिहिले आहे. हे नाव तिने आपले मधले नाव म्हणून ठेवले आहे.
नाव बदलण्याबाबत कियारा म्हणाली होती की, तिचा ज्योतिषांवर विश्वास नाही. तिला तिच्या मेहनतीच्या जोरावर आपला ठसा उमटवायचा होता म्हणून तिने नाव बदलले. मात्र, कियाराचे जवळचे नातेवाईक फिल्मी दुनियेशी संबंधित आहेत. शाहीन जाफरी ही कियाराची मावशी आहे. शाहीन ही ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांची नात आहे. त्यावेळी सलमान खान आणि शाहीन जाफरी यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. इतकंच नाही तर, कियारा अभिनेत्री जुही चावलाची भाची आहे.
२०१६मध्ये, कियारा नीरज पांडेच्या स्पोर्ट्स ड्रामा फिल्म 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' मध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने धोनीची पत्नी साक्षीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिची छोटीशीच भूमिका होती. यानंतर तिला खरी ओळख 'कबीर सिंग' चित्रपटातूनच मिळाली. कियाराने 'शेरशाह' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केले होते. दोन्ही स्टार्सचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील कियाराचा अभिनय खूप आवडला होता. कियारा 'भूल भुलैया २'मध्ये दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.
संबंधित बातम्या