साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आज १९ जून रोजी तिचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. काजल अग्रवाल अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये झळकली आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली काजल अग्रवाल दररोज तिच्या मुलासोबतचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काजल अग्रवाल ही आजघडीला तेलगू आणि तमिळ चित्रपट विश्वातील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, तिची खास जादू बॉलिवूडमध्ये चालू शकली नाही. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या काही खास गोष्टी...
काजलचा जन्म १९ जून १९८५ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यानंतर तिने मुंबईच्या केसी कॉलेजमधून मास मीडिया स्ट्रीममध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. काजलने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. काजलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला लहानपणापासूनच टीव्ही पत्रकार बनायचे होते. पण, ओघओघात ती अभिनेत्री बनली. काजलने चित्रपटात येण्यापूर्वी एमबीएचे शिक्षण घेण्याची योजना आखली होती. पण त्यातही ती अयशस्वी ठरली.
काजलने 'लक्ष्मी कल्याणम' या चित्रपटातून कल्याण रामसोबत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. काजलला तिचे पहिले व्यावसायिक यश तेलुगू चित्रपट 'चंदामामा' मधून मिळाले आणि २००९च्या 'मगधीरा' चित्रपटाने तिला तेलुगू चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. या चित्रपटाच्या यशानंतर काजलच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. 'मगधीरा'मध्ये तिच्यासोबत तेलगू चित्रपट स्टार रामचरण तेजा होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटासाठी काजलला सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगणसोबत काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे काजल अग्रवालचे नाव चर्चेत होते, मात्र या चित्रपटापूर्वीच २००४ साली काजलने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या 'क्यो! हो गया ना' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात काजलने ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
काजल आणि गौतम यांची पहिली भेट अनेक वर्षांपूर्वी कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली होती. पहिल्या भेटीनंतर काजल आणि गौतममध्ये मैत्री झाली. दोघेही जवळपास ७ वर्षे ते एकमेकांचे मित्र होते आणि नंतर या मैत्रीने प्रेमाचे रूप धारण केले. लग्नापूर्वी त्यांनी एकमेकांना जवळपास ३ वर्षे एकमेकांना डेट केले. एका मुलाखतीत काजलने सांगितले होते की, सोशल पार्टी असो की प्रोफेशनल मीटिंग, दोघेही एकमेकांना भेटत असत. पण, लॉकडाऊनच्या काळात अनेक आठवडे भेटू शकले नाही, तेव्हा दोघांनाही कळले ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या