Happy Birthday Johnny Lever: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लीव्हर आज (१४ ऑगस्ट) आपला ६७वा वाढदिवस साजरा करत आहेत. जॉनी लीव्हर यांना भारतातील स्टँड-अप कॉमेडीचे प्रणेते मानले जाते. आपल्या दमदार विनोदी अभिनयाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यांच्या अशा अनेक भूमिका आहेत, ज्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. अभिनेत्याचे खरे नाव जॉनराव प्रकाशराव जनुमाला आहे. मग त्यांना जॉनी लीव्हर हे नाव कसे मिळाले? चला जाणून घेऊया या मागचा खास किस्सा...
जॉनी लीव्हर यांचे खरे नाव एकदमच वेगळेच होते, पण त्यांना आताचे हे नाव कसे पडले याची कहाणी खूप रंजक आहे. एकदा हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनीत एक कार्यक्रम सादर करत असताना त्यांनी या कार्यक्रमादरम्यान काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नक्कल केली. यानंतर त्यांना जॉनी लीव्हर म्हटले जाऊ लागले आणि पुढे ते याच नावाने प्रसिद्ध झाले.
जॉनी लीव्हरने आतापर्यंत ३५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या दमदार विनोदांनी सगळ्यांनाच पोटधरून हसायला लावले आहे. मात्र, इतरांच्या चेहऱ्यावर हसू खुलवणाऱ्या या अभिनेत्याचा प्रवास खूपच खडतर होता. बालपणी जॉनी लीव्हर यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळेच त्यांना ७वी नंतर शिक्षण सोडावे लागले. यानंतर त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर पेन विकायला सुरुवात केली. पेन विकतानाच ते बॉलिवूड स्टार्सची नक्कल देखील करून दाखवायचे. त्यांच्या हाच प्रवास आज त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेला आहे.
जॉनी लीव्हर यांना खाण्यापिण्याची खूप आवड आहे. त्याला विशेषतः सांबर आणि भात यासारखे दक्षिण भारतीय पदार्थ आवडतात. ते स्वतः दक्षिण भारतातील असून, त्यांचा जन्म तेलुगू ख्रिश्चन कुटुंबात झाला. ‘कॉमेडीचा बादशाह’ असणाऱ्या जॉनी लीव्हर यांना केवळ लोकांना हसवण्याचे वेड नाही, तर संगीताचेही वेड आहे. त्यांना गझल ऐकायला आणि आरामदायी संगीत ऐकायला खूप आवडते. त्यांच्या आयुष्यात कॉमेडीचा मोठा वाटा असला, तरी खऱ्या आयुष्यात तो खूप वक्तशीर आणि कडक शिस्तीचे वडील आहेत. जॉनी लीव्हर इतके शिस्तबद्ध आणि वक्तशीर आहेत की, ते नेहमी सेटवर वेळेवर पोहोचतात.