Happy Birthday Hrithik Roshan: बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र, त्यातील काहीच जणांना आपली जागा टिकवून ठेवता आली. यापैकी एक नाव हृतिक रोशनचे देखील आहे. अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा हृतिक रोशन याला 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती. या चित्रपटाने हृतिकला रातोरात सुपरस्टार बनवले होते. गेल्या २४ वर्षांपासून ह्रतिक रोशन हा 'एव्हरग्रीन क्रश' म्हणून ओळखला जातो. १० जानेवारी रोजी अभिनेता आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...
- अभिनेता हृतिक रोशन याला बॉलिवूडचा 'ग्रीक ऑफ गॉड' म्हणून ओळखले जाते. आजही हृतिक रोशन याचा जगातील सर्वात देखण्या अभिनेत्यांच्या टॉप १० यादीत समावेश आहे.
- हृतिक ‘रोशन’ हे आडनाव लावतो. मात्र, हे अभिनेत्याचे खरे आडनाव नाही. हृतिकचे खरे आडनाव 'नागरथ' असे आहे. त्याचे पूर्ण नाव हृतिक राकेश नागरथ असे आहे. 'रोशन' हे आडनाव हृतिकच्या आजीचे होते, जे नंतर राकेश यांनी आपल्या नावाशी जोडले.
- १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईत जन्मलेला हृतिक रोशन हा पदवीधर आहे. मुंबईच्या स्कॉटिश कॉलेजमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने सिडनहॅम कॉलेजमधून बी.कॉम.सोबतच नृत्य आणि संगीताचे प्रशिक्षणही घेतले आहे.
- ऋतिक रोशन 'डुग्गु' म्हणून देखील ओळखला जातो. हृतिकची आजी आपल्या मुलाला म्हणजेच राकेश रोशन यांना प्रेमाने 'गुड्डू' असे नाव ठेवले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नातवाचे टोपणनाव 'डुग्गू' असे उलटे करून ठेवले आहे.
- हृतिकने वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती. 'आशा' हा त्याचा पहिला चित्रपट होता. यासाठी त्याला १०० रुपये पगार मिळाला होता. त्याने या पहिल्या पगारातून १० हॉट व्हील्स कार खरेदी केल्या होत्या.
- हृतिक रोशन जगातील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक आहे. त्याच्या डान्स मूव्हचे लोक दिवाने आहेत. मात्र, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की, हृतिक कधीही डान्स करू शकत नाही. हृतिकला ‘स्कोलियोसिस’ नावाचा आजार होता.
- २०००मध्ये जेव्हा 'कहो ना प्यार है' रिलीज झाला होता, तेव्हा हृतिक रोशन ‘नॅशनल क्रश’ बनला होता. हृतिकची मुलींमध्ये क्रेझ इतकी वाढली होती की, त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल ३० हजार लग्नाचे प्रस्ताव आले होते.