Happy Birthday Genelia D’Souza: हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी आणि प्रतिभावान अभिनेत्री जिनिलिया डिसुझा हिचा आज (५ ऑगस्ट) ३७वा वाढदिवस आहे. ५ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईत जन्मलेली जिनिलिया एका कॅथलिक कुटुंबातील आहे. जिनिलियाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाने मन जिंकून घेणारी जिनिलिया खेळात देखील तरबेज आहे. तिचे हेच गुण तिच्या मुलांमध्ये देखील उतरले आहेत.
जिनिलिया डिसुझाबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे, अभिनेत्री तिच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात राज्यस्तरीय धावपटू, आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू होती. तिने वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिने २००३मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती पती रितेश देशमुखसोबत दिसली होती. हिंदी, तेलगू, कन्नड आणि तमिळ अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात स्वत:साठी एक वेगळे स्थान मिळवले आहे.
जिनिलिया डिसुझाबद्दल आणखी एक गोष्ट जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तविक, जिनिलियाने कधीच अभिनय आणि मॉडेलिंगचा विचार केला नव्हता, उलट तिला एखाद्या मोठ्या कंपनमध्ये काम करायचे होते. परंतु, कदाचित देवाच्या मनात काहीतरी वेगळेच असेल. अभिनेत्री एका लग्नाला उपस्थित राहिली होती, त्या दरम्यान तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत लोकप्रिय पार्कर पेनची जाहिरात करण्याची ऑफर मिळाली. या जाहिरातीत जिनिलियाने बिग बींच्या फॅनची भूमिका साकारली होती.
जिनिलिया डिसुझा आणि रितेश देशमुख यांची पहिली भेट २००३मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यादरम्यान, पहिल्या नजरेत रितेश जिनिलियाच्या प्रेमात पडला होता. परंतु, अभिनेत्रीसोबत बरोबर उलटे झाले. पण, नंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही भेटले आणि प्रेमात पडले. दरम्यान, जिनिलिया १६ वर्षांची होती आणि रितेश २४ वर्षांचा होता. मात्र, नंतर या दोघांनी १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२मध्ये लग्न केले. आता दोघांना रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत. दोन्ही मुले आईच्या पावलावर पाऊल ठेवून आतापासूनच फुटबॉलचं प्रशिक्षण घेत आहेत.