Happy Birthday Farhan Akhtar : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने शोबिझशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात प्रभुत्व मिळवले आहे. दिग्दर्शन, अभिनय, गायन आणि लेखनातही त्याने आपले कौशल्य सिद्ध केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध चित्रपट कुटुंबात जन्माला येऊनही फरहान अख्तरने स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आज म्हणजेच ९ जानेवारी रोजी हा अभिनेता-चित्रपट निर्माता आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी...
फरहान अख्तर हा ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे. स्टार किड असल्याने तो नेहमीच चर्चेत असायचा, पण चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी फरहानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. १९९१मध्ये त्यांनी 'लम्हे' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर १९९७मध्ये त्याने दिग्दर्शक पंकज पराशर यांच्या 'हिमालय पुत्र' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. या चित्रपटातून अक्षय खन्नाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, फरहानचा खरा संघर्ष यानंतर सुरू झाला.
फरहान अख्तर याने आपले शिक्षण अर्धवट सोडले होते. यानंतर तो वर्षानुवर्षे घरीच बसून राहिला. त्याच्या आईला हे आवडले नाही. बेकार राहून घरी बसण्याच्या सवयीमुळे त्याच्या आईने त्याला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. या भीतीपोटी फरहानने वडिलांप्रमाणे कथा लिहायला सुरुवात केली आणि इथूनच 'दिल चाहता है'ची स्क्रिप्ट आली. त्याच्या दिग्दर्शनाखाली आणि निर्मितीमध्ये बनलेला हा पहिला चित्रपट आहे, जो चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट ठरला होता. बदलत्या शतकात वाऱ्याची बदलती दिशा ओळखणारा हा त्याच्या काळातील कल्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
यानंतर त्याने 'लक्ष्य' चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. पण, फरहान इथेच थांबला नाही. यानंतर त्याने अभिनयात हात आजमावला आणि इथेही त्याने जबरदस्त यश मिळवले.
फरहान अख्तरने 'रॉक ऑन' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी गाणीही गायली आहेत. अभिनेता आणि गायक या रुपातही फरहान प्रेक्षकांना आवडला. यानंतर त्याने 'लक बाय चान्स', ' जिंदगी ना मिलेगी दोबारा ', 'भाग मिल्खा भाग' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. फरहान अख्तरने हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपले पंख पसरले आहेत. 'प्राइड अँड प्रिज्युडिस' या प्रसिद्ध चित्रपटाच्या साऊंड ट्रॅकद्वारे त्याने हॉलिवूड चित्रपटांतील करिअरला सुरुवात केली.
संबंधित बातम्या