Happy Birthday Dia Mirza : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली दिया मिर्झा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ९ डिसेंबर १९८१ रोजी हैदराबादमध्ये जन्मलेली दिया मिर्झा 'रेहना है तेरे दिल में' चित्रपटाची नायिका म्हणून ओळखली जाते. हा या अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटापासून दियाने आपल्या निरागसतेने लोकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक पैलूंवर एक नजर टाकूया...
दिया मिर्झाची आई दीपा बंगाली हिंदू आहे, तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. दिया अवघ्या ४ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. दियाच्या आईने हैदराबादच्या अहमद मिर्झासोबत दुसरे लग्न केले, त्यानंतर दियाने तिच्या नावासमोर मिर्झा लिहिण्यास सुरुवात केली. दिया मिर्झाने वयाच्या १६ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. ती एका मल्टीमीडिया कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. निरागस आणि नितळ सौंदर्यामुळे कॉलेजच्या दिवसांपासून दियाला अनेक मोठ्या कंपन्यांकडून मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या.
२०००मध्ये दियाने ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला होता. ती सेकंड रनर अप ठरली होती. तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत मिस ब्युटीफुल स्माइल, मिस एव्हॉन आणि मिस क्लोज-अप स्माइल ही स्पर्धा जिंकली. वयाच्या १८ व्या वर्षी दिया मिर्झा मिस एशिया पॅसिफिकचा किताब जिंकण्यात यशस्वी ठरली होती. यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले.
वासू भगनानी यांनी दिया मिर्झाला चित्रपट विश्वात आणले होते. 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटात त्यांनी अभिनेत्रीला पहिला ब्रेक दिला. त्यांचा हा चित्रपट तूफान गाजला आणि त्यामुळे तिचे नशीब रातोरात बदलले. २००१मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात आर माधवन दिया मिर्झा सोबत होता. चित्रपट पाहिल्यानंतर लोक दिया मिर्झाच्या हसण्यावर आणि निरागसतेवर अक्षरश: फिदा झाले. यानंतर दियाला 'तुमको ना भूल पायेंगे' हा चित्रपट मिळाला. दियाला वाटत होते की, सलमानसोबत काम केल्याने ती अधिक लोकप्रिय होईल आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड मोडेल. मात्र, त्याचा परिणाम नेमका उलट झाला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. पहिला चित्रपट मोठा हिट आणि ब्लॉकबस्टर हिट असूनही दिया इंडस्ट्रीत जास्त काळ टिकू शकली नाही. 'दीवानापन', 'तुमको ना भूल पायेंगे', 'दम', 'परिणीता', 'लगे रहो मुन्नाभाई' आणि 'संजू' यांसारख्या चित्रपटांसाठी ती ओळखली जाते.
दिया मिर्झाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर दिया मिर्झाने ऑक्टोबर २०१४मध्ये तिचा बिझनेस पार्टनर साहिल संगासोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. यानंतर अभिनेत्रीने २०२१मध्ये वैभव रेखीशी लग्न केले आणि ती सध्या आपल्या कुटुंबासोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे.