Happy Birthday Dada Kondke: अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच दादा कोंडके. ८ ऑगस्ट १९३२ रोजी मध्य मुंबईतील नायगावच्या रस्त्यांवरून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अशा एका स्थानावर पोहोचला, जेव्हा त्यांना संपूर्ण चित्रपटसृष्टीने ओळखले. गिरणी कामगारांच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि गिरणी बंद होईपर्यंत मुंबईत गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या माणसासाठी ही नक्कीच सोपी गोष्ट नव्हती. मध्यमवर्गीय व्यक्तिमत्व, फारसे शिक्षण नव्हते, मात्र त्यांना मनोरंजनाची आवड होती. त्यांनी दादर आणि परळच्या आसपासच्या भागात स्थानिक बँडमध्ये वाजवायला सुरुवात केली आणि ते ‘बँडवाले दादा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले. दुहेरी अर्थाचे शब्द आणि संवाद निर्माण केले, ज्याने हजारो प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि पारंपारिक मराठी रंगभूमीला मोठा धक्का दिला होता.
दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटांमध्ये मोठा बदल घडवून आणला. दहा वर्षांत सुमारे वीस चित्रपट बनवून मराठी मनोरंजन विश्वावर राज्य केले. दादा कोंडके म्हणजे सरकार, व्यवस्था, धर्म, भ्रष्टाचार आणि खोट्या जीवनमानाचा वेध घेणारे अगदी चॅप्लिनसारखे किंवा राज कपूरसारखे पात्र होते. त्यांच्या याच व्यक्तीमत्त्वामुळे जनतेला आणि अगदी वेगवेगळ्या वर्गातील, अगदी उच्च स्थानावरील लोकांनाही त्यांना गांभीर्याने घेण्यास भाग पाडले. कारण, दादा कोंडके यांनी लोकांच्या वास्तविक समस्यांबद्दल आपल्या लोकप्रिय शैलीत चर्चा केली, जी पुढे सगळ्यांनाच पटू लागली. इतकंच काय तर, त्यांनी आपल्या चित्रपटांमधून आणि संवादांमधून मारलेले टोमणेही लोकांना कळू लागले.
राजकारणातही त्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या सभांना गर्दी जमवण्याचे काम दादा कोंडके करायचे. आपल्या भाषणांमधून ते प्रतिस्पर्ध्यांवरही जोरदार हल्लाबोल करायचे. दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे एक स्वप्न होते. ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय’ असंही त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र, ते आमदारही होऊ शकले नाहीत आणि त्यांचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. त्यांचा वापर फक्त गर्दी जमवण्यासाठी केला गेला.
दादा कोंडके यांचा १९७५साली आलेला ‘पांडू हवालदार’ हा चित्रपट खूप गाजला होता. यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतरच हवालदारांना पांडू म्हटले जाऊ लागले. त्यांच्या इतर प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘सोंगाड्या’, ‘आली अंगावर’ असे काही चित्रपट आहेत. तर, 'विच्छा माझी पुरी करा' या मराठी नाटकासाठीही ते प्रसिद्ध आहेत. हे काँग्रेसविरोधी नाटक मानले गेले होते. या नाटकामध्ये इंदिरा गांधींची खिल्ली उडवली गेली होती.