Happy Birthday Chiranjeevi: दक्षिण भारतात देवाप्रमाणे पूजल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचा वाढदिवस दक्षिणात्य चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. आपण ज्या साऊथ स्टारबद्दल बोलत आहोत, तो आहे सुपरस्टार चिरंजीवी. मेगास्टार चिरंजीवीचा आज ६९वा वाढदिवस आहे. चिरंजीवी एक असा अभिनेता आहे, ज्याने स्वतःच्या बळावर साऊथ मनोरंजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशी ओळख निर्माण करायला कोणत्याही अभिनेत्याला अनेक वर्षे लागतात. चिरंजीवीने केवळ साऊथ चित्रपटातच काम केले नाही, तर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
चिरंजीवीच्या अभिनयाचे जितके कौतुक करावे, तितके कमीच आहे. अभिनेता त्याच्या उत्कृष्ट संवाद वितरणासाठी आणि दमदार अभिनयासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. चिरंजीवीचा कोणताही नवा चित्रपट आला की, दक्षिणेतील चित्रपटगृहांमध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचे आवाज घुमू लागतात. आज चिरंजीवीच्या वाढदिवशी त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया...
साऊथचा मेगास्टार चिरंजीवी याने १९७९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुंढिराल्लू' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतरही हा अभिनेता प्रसिद्ध झाला आणि त्याच्या पदार्पणातच त्याने एकूण १४ चित्रपटांमध्ये काम केले. तेव्हापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आजही अविरतपणे सुरू आहे. चिरंजीवीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याची एकूण संपत्ती १६५० कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, मेगास्टार्स त्यांच्या व्यवसाय, जाहिराती आणि गुंतवणूकीतूनही मोठी कमाई करतो. त्याच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा हैदराबादमध्ये एक अतिशय आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे २८ कोटी रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत, ज्यात रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज-बेंझ एएमजी जी क्लास, रोल्स रॉयस फँटम आणि टोयोटा लँड क्रूझर यांचा समावेश आहे.
चिरंजीवीच्या स्टारडमबद्दल आपण जितके जास्त बोलू तितकेच ते कमी पडू लागेल. ९०च्या दशकापासून ते आजतागायत तो आपले स्टारडम टिकवून आहे. मेगास्टार हा ९०च्या दशकात इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता होता. त्यावेळी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन एका चित्रपटासाठी ९० लाख रुपये मानधन घेत असत. पण, मेगास्टारने हा विक्रम मोडून नवा विक्रम केला. १९९२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आपडबांधवुडू' या चित्रपटासाठी अभिनेत्याने १.२५ कोटी रुपये फी आकारली होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून चिरंजीवीचे नाव घेतले जाऊ लागले.