Happy Birthday Boney Kapoor : चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आणि अनेक कलाकारांना स्टार बनवले. त्यांनी इंडस्ट्रीला ‘मिस्टर इंडिया’ ते ‘जुदाई’, ‘वाँटेड’, ‘नो एंट्री’ आणि ‘मॉम’सारखे चित्रपट दिले आहेत. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आज त्यांचा ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत. बोनी कपूर यांनी नेहमी पडद्यामागेच काम केले असले, तरी ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोंधळामुळे ते अनेकदा चर्चेचा भाग बनले.
बोनी कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे, तर त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५५ रोजी प्रसिद्ध चित्रपट निर्माता सुरिंदर कपूर यांच्या घरी झाला. बोनी कपूर हे त्यांच्या आई-वडिलांचे सर्वात मोठे अपत्य होते आणि अनिल कपूर, संजय कपूर, रीना कपूर ही त्यांची भावंडं होती. बोनी कपूर यांचे आधी मोना शौरीसोबत लग्न झाले होते. या लग्नापासून त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुले झाली. पण, नंतर श्रीदेवीने बोनीच्या आयुष्यात प्रवेश केला, जो आधीच विवाहित आणि दोन मुलांचा पिता होता.
बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांची पहिली पत्नी मोना शौरी हिला घटस्फोट देऊन १९९६ मध्ये श्रीदेवीशी लग्न केले. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची प्रेमकहाणीही प्रचंड प्रसिद्धी झोतात होती. मात्र, बोनी कपूर यांना एक वाईट सवय होती, जी सोडवण्यासाठी श्रीदेवीने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.
बोनी कपूर यांना एक वाईट सवय होती. यामुळे केवळ पत्नी श्रीदेवीच नाही, तर त्यांची मुलगी जान्हवी कपूरही हैराण झाली होती. बोनीला या सवयीपासून दूर करण्यासाठी श्रीदेवीने अनेक प्रयत्न केले होते. बोनी कपूर यांना सिगारेट ओढण्याची सवय होती, त्यामुळे श्रीदेवी खूप नाराज होत्या. याबाबत बोलताना एकदा जान्हवीने सांगितले होते की, एकदा बोनी कपूर यांच्या सिगारेटच्या व्यसनामुळे श्रीदेवीने आपला जीव धोक्यात घातला होता. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांना धूम्रपानाची अशी सवय लागली होती की, ती सोडता देखील येत नव्हती. त्यांच्या या सवयीमुळे श्रीदेवी आणि जान्हवी नाराज झाल्या होत्या. आपल्या वडिलांना या सवयीपासून मुक्त करण्यासाठी खुशी आणि जान्हवीने वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला होता, पण काहीच परिणाम झाला नाही.
जेव्हा कोणतीही पद्धत त्यांच्यावर काम करत नव्हती, तेव्हा श्रीदेवी हिने पूर्ण शाकाहारी जेवण खायला सुरुवात केली. मात्र, त्या काळात श्रीदेवी खूप अशक्त होती, त्यामुळे डॉक्टरांनी तिला नॉनव्हेज खाण्याचा सल्ला दिला होता. पण, बोनी सिगारेट पिणे बंद करतील म्हणून तिने मुद्दाम शाकाहारी जेवण चालू ठेवले. बोनी कपूर त्यावेळी श्रीदेवीला डॉक्टरांच्या सल्ल्याने अन्न खाण्याची विनंती करत राहिले, पण ती मान्य झाली नाही. मात्र, तरीही बोनी कपूर यांचं व्यसन सुटलं नाही.