Boman Irani Birthday: ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चे ‘डॉक्टर अस्थाना’ असो वा ‘थ्री इडियट्स’मधील ‘व्हायरस’ अभिनेते बोमन इराणी त्यांच्या प्रत्येक भूमिकेमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. आज (२ डिसेंबर) बोमन इराणी त्यांचा ६३वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या ४२व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करून मोठा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणून बोमन इराणी यांचं नाव घेतलं जातं. आजघडीला एक यशस्वी अभिनेता असणाऱ्या बोमन इराणी यांचं सुरूवातीच आयुष्य फार कठीण होतं.
बोमन इराणी यांच्या जन्माच्या काही दिवस आधीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आई आणि बहिणींनी मिळून बोमनसह संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परस्थिती अतिशय हालाखीची होतील. घराची जबाबदारी खांद्यावर आल्यावर बोमन इराणी यांनी देखील काम सुरु केले होते. बोमन इराणी यांना नेहमीच फोटोग्राफर बनायचं होतं. प्रत्येक क्षण अगदी अलगदपणे कॅमेरात कैद करणारे बोमन इराणी उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आहेत.
सुरुवातीच्या काळात त्यांनी फोटोग्राफी केली. यासाठी त्यांना थोडेसे पैसे देखील मिळायचे. पुण्यात पार पडलेल्या एका बाईक रेसची प्रोफेशनल फोटोग्राफी करण्याची संधी बोमन इराणी यांना मिळाली होती. या संधीचं त्यांनी सोनं केलं. यानंतर त्यांना मुंबईतील बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करण्याची संधी देखील मिळाली. केवळ फोटोग्राफरच नव्हे तर, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी ताज हॉटेलमध्ये काही काळ नोकरी देखील केली.
बोमन इराणी ताज हॉटेलमध्ये वेटर आणि सर्व्हिस स्टाफ म्हणून काम करत होते. २ वर्ष त्यांनी ही नोकरी केली. त्यांची आई एक छोटसं बेकरीवजा दुकान चालवत होती. आईच्या मदतीसाठी काही काळाने बोमन यांनी ताज हॉटेलमधील नोकरी सोडली आणि दुकानाचं काम सांभाळण्यास सुरुवात केली. बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक डावर यांच्या भेटीमुळे बोमन इराणी यांचं आयुष्य बदललं. शामक डावर यांनीच बोमन इराणी यांना थिएटर जॉईन करण्याचा सल्ला दिला. इथूनच त्यांच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाला सुरुवात झाली. 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लक्ष्य', 'वीर-जारा', 'पेज-3', 'नो एन्ट्री', ‘उंचाई’सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका केल्या.
संबंधित बातम्या