Happy Birthday Bobby Deol : 'ॲनिमल' या चित्रपटात अबरारची भूमिका करून जगाला वेड लावणाऱ्या अभिनेता बॉबी देओलचे लोकांना वेड लागले आहे. चित्रपटातील एकही संवाद न बोलता लोकांची मने जिंकून घेणाऱ्या बॉबीला लोकांनी 'लॉर्ड बॉबी' असे नाव ठेवले आहे. धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओल आज (२७ जानेवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे . बॉबी देओलचा जन्म २७ जानेवारी १९६९ रोजी मुंबईत झाला होता . बॉबी हा धर्मेंद्र आणि त्याची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मुलगा आहे . त्याचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की बॉबी देओलने अनेक वर्षांपासून या यशाची वाट पाहिली आहे. एक काळ असा होता की त्याच्याकडे काहीच काम नव्हते. अशावेळी त्याने एका क्लबमध्ये डीजे म्हणून काम केले आहे. आज बॉबीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया.
बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्याला जबरदस्त यश मिळाले. त्याची स्टाइल आणि त्याच्या अभिनयाने लोकांना इतके आकर्षित केले की, तो रातोरात स्टार बनला. बॉबी आणि ट्विंकल खन्ना यांनी 'बरसात' या चित्रपटाद्वारे एकत्र चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर बॉबीकडे अनेक चित्रपट आले. त्यानंतर बॉबी देओलने 'सोल्जर' , 'गुप्त : द हिडन ट्रुथ' , 'दिल्लगी' , 'बादल' , 'बिच्चू' , 'क्रांती' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
नशिबाचा तारा रोज सारखा चमकत नाही आणि बॉबी देओलसोबतही असंच काहीसं घडलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॅक टू बॅक सुपरहिट देणारा बॉबी अचानक अपयशाच्या फेऱ्यात अडकला . बॉलिवूडमध्ये चांगल्या नाव कमावलेल्या आणि धर्मेंद्रसारख्या स्टारचा मुलगा आणि सनी देओलचा भाऊ असूनही एक काळ असा होता की बॉबी देओलकडे काहीच काम नव्हते . त्यावेळी अशी परिस्थिती बनली की, १० वर्षे कोणतेही काम न मिळाल्याने त्याने २०१६मध्ये दिल्लीतील एका नाईट क्लबमध्ये डीजे म्हणून काम करायला सुरुवात केली होती.
बॉबी देओलच्या या कठीण काळात सलमान खान मसिहा बनून आला आणि त्याने त्याला इंडस्ट्रीत परत आणले. २०१८साली सलमान खानने बॉबीला 'रेस ३' या चित्रपटाची ऑफर दिली होती. या चित्रपटानंतर बॉबीच्या आयुष्याची कथाच बदलून गेली. यानंतर तो अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल ४'मध्ये दिसला होता. मात्र, बॉबी जेव्हा वेब सीरिज 'आश्रम'मध्ये बाबाच्या भूमिकेत दिसला, तेव्हा लोकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतला. अखेर २०२३मध्ये बॉबी देओलचे नशीब उजळले आणि 'ॲनिमल' चित्रपटातील अबरारच्या भूमिकेने तो प्रसिद्ध झाला .
संबंधित बातम्या