Happy Birthday Bipasha Basu: बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री बिपाशा बसू आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ७ जानेवारी १९७९ रोजी दिल्लीत बिपाशाचा जन्म झाला. ‘हेराफेरी’, ‘धूम’, ‘राज’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारी बिपाशा गेली काही वर्षे मात्र इंडस्ट्रीपासून दूर आहे. अभिनेता करण सिंह ग्रोव्हर याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर बिपाशाने आपल्या संसारात रमण्याचा निर्णय घेतला. परंतु, करणशी लग्न करण्यासाठीच बिपाशाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
करण सिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बसू लग्नाआधी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांची पहिली भेट ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. बिपाशा बसू ही करण सिंह ग्रोव्हर याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. करणसोबत लग्न करण्यासाठी बिपाशाला खूप मेहनत घ्यावी लागली होती. बिपाशाशी लग्न करण्यापूर्वी करण सिंह ग्रोव्हरची दोन लग्न मोडली होती. तर, काही अभिनेत्री आणि मॉडेल्सशी त्याचे नाव जोडले गेले होते. यामुळेच बिपाशाच्या घरून या नात्याला तीव्र विरोध होता.
करणशी लग्न करण्यासाठी बिपाशाला घरच्यांची मनधरणी करावी लागली होती. अशावेळी बिपाशा आपल्या प्रेमावर आणि निर्णयावर ठाम राहिली. कुटुंबाशी युक्तिवाद करताना बिपाशा म्हणाली की, ‘मी देखील एका नात्यात होते. माझं नातं त्याच्या लग्नापेक्षा अधिक काळ चाललं. आमच्यात फरक इतकाच होता की, त्याने एक कागदावर सही केली होती आणि मी अशी कोणतीच सही केली नव्हती. मात्र, आता देखील अशाच गोष्टी घडतील असे नाही. त्याचे हे तिसरे लग्न आहे. हेही मोडेल आणि त्यांच्या घटस्फोट होईल, असे म्हणणे लोकांसाठी सोपे आहे. परंतु, आम्ही आमच्या नात्यासाठी नेहमी एकमेकांसोबत उभे राहू.’
बिपाशाच्या या ठाम निर्णयापुढे अखेर त्यांच्या कुटुंबाला नमतं घ्यावं लागलं. ३० एप्रिल २०१६ रोजी या जोडीने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या ६ वर्षांनंतर आता त्यांच्या संसारवेलीवर ‘देवी’ नावाचं एक फूल देखील उमललं आहे. नोव्हेंबर महिन्यात बिपाशाने मुलीला जन्म दिला.