Happy Birthday Bhumi Pednekar: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हे एक असं नाव आहे, जे अल्पावधीतच बॉलिवूड विश्वात प्रचंड गाजलं. अवघ्या ८ वर्षांच्या कारकिर्दीत भूमीने दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमावले आहे. भूमी पेडणेकर आज (१८ जुलै) तिचा ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. २०१५मध्ये 'दम लगा के हईशा' या चित्रपटाद्वारे भूमीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आयुष्मान खुरानाही मुख्य भूमिकेत दिसला होता. प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला होता.
'दम लगा के हईशा' या चित्रपटात एका लठ्ठ महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. भूमीने या महिलेची भूमिका उत्तम प्रकारे साकारली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कारही मिळाला होता. 'दम लगा के हईशा' चित्रपटादरम्यान भूमीचे वजन ७२ किलो होते. या चित्रपटात भूमीने एका जाड मुलीची भूमिका साकारली होती, ज्यासाठी तिने सुमारे ३० किलो वजन वाढवले होते. या चित्रपटात भूमीने जबरदस्त अभिनय केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भूमी पेडणेकरने अवघ्या काही महिन्यांत तिचे वजन पूर्णपणे कमी करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
ग्लॅमरस आणि स्लिम फॉर्ममध्ये भूमी पेडणेकरला पाहून सगळेच थक्क झाले होते. भूमीचा फिटनेसचा प्रवास तिच्या पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत कायम आहे. फिटनेसच्या मागे भूमी खूप मेहनत घेताना दिसत आहे. वर्कआऊटसह काटेकोर डाएट फॉलो केल्यामुळे तिने काही महिन्यांतच ३२ किलो वजन कमी केले होते.
‘दम लगा के हईशा’पासून ते ‘बधाई दो’पर्यंत भूमीने नेहमीच वेगवेगळ्या आणि हटके विषयांवरील चित्रपट निवडले. ‘शुभ मंगल सावधान’, ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘बाला’, ‘लस्ट स्टोरीज’ अशा चित्रपटांचाही या यादीत समावेश आहे. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटानंतर भूमी पेडणेकर हिला तब्बल २४ चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण, कथानक न आवडल्याने तिने हे २४ चित्रपट सलग नाकारले होते.