Happy Birthday Arun Govil: छोटा पडदा असो वा मोठा पडदा ‘रामायणा’चे कितीही व्हर्जन आले तरी, रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिकाच या सगळ्यात पहिल्या क्रमांकावर येते. आजही या मालिकेचं गारुड प्रेक्षकांच्या मनावर पाहायला मिळतं. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना आजही लोक खऱ्या देवांइतकाच मान देतात. या मालिकेत अभिनेते अरुण गोविल हे भगवान श्रीरामाच्या भूमिकेत झळकले होते. आज (१२ जानेवारी) अभिनेते अरुण गोविल यांचा वाढदिवस आहे. याच खास निमित्ताने जाणून घेऊया अरुण गोविल यांना ही भूमिका कशी मिळाली?
अभिनेते अरुण गोविल यांनी ‘रामायण’ या मालिकेत प्रभू श्रीराम साकारले होते. या भूमिकेमुळे खऱ्या आयुष्यात देखील लोक त्यांना राम समजू लागले होते. मात्र, अभिनेते अरुण गोविल जेव्हा पहिल्यांदा या भूमिकेसाठी रामानंद सागर यांच्याकडे गेले तेव्हा त्यांच्या हाती रिजेक्शन पडलं होतं. ‘रामायण’चे निर्माते रामानंद सागर यांनी स्वतः अभिनेते अरुण गोविल यांचं ऑडिशन घेतलं होतं. आणि पहिल्याच ऑडिशनमध्ये अरुण गोविल यांना श्रीरामाची भूमिका देण्यास नकार दिला होता. श्रीरामाच्या भुमिकेऐवजी तू भरत किंवा लक्ष्मण यांपैकी एखादी भूमिका कर, अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती.
मात्र, आपण श्रीरामच साकारणार याच उद्देशाने तिथे ऑडिशन द्यायला पोहोचलेल्या अरुण गोविल यांनी इतर कोणत्याही भूमिकेसाठी सरळ नकार दिला. त्यांनी निर्मात्यांना थेट म्हटलं की, ‘मी इथे केवळ प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी आलो होती. पण, जर त्यात मी बसत नसेन, तर काहीही हरकत नाही. परंतु, मला इतर कोणतीही भूमिका नकोय.’ पुढे या मालिकेत रामाच्या भूमिकेत एक दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. मात्र, काहीच दिवसांनी निर्मात्यांनी अरुण गोविल यांना फोन करून पुन्हा बोलवून घेतले आणि त्यांनाच ही भूमिका करण्यास सांगितली.
रमानंद सागर यांना अरुण गोविल यांच्या चेहऱ्यावर दिसलेले भाव आणि त्यांचं शांत हसणं, इतर कोणत्या अभिनेत्यामध्ये दिसलं नाही. म्हणूनच रामानंद सागर यांनी पुन्हा एकदा अरुण गोविल यांनाच बोलवून त्यांना रामाची भूमिका देऊ केली. पुढे या मालिकेने जो इतिहास घडवला, तो अनेक पिढ्यांनी पाहिला.