Happy Birthday Anu Aggarwal: ‘आशिकी' या चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल आता फारशी चर्चेत नसते. अर्थात या मागे एक मोठं कारण देखील आहे. अभिनेत्री जशी रातोरात चर्चेत आली तशीच ती रातोरात मनोरंजन विश्वातून गायब झाली. आज (११ जानेवारी) अभिनेत्री अनु अग्रवाल ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. ११ जानेवारी १९६९ रोजी दिल्लीत जन्मलेल्या अनु अग्रवालला 'आशिकी' या चित्रपटाने रातोरात सुपरस्टार बनवले होते. या चित्रपटानंतर अनु अग्रवालकडे चित्रपटांची रांग लागली होती.
‘आशिकी’ या चित्रपटानंतर अनु अग्रवालने आणखी काही चित्रपट केले. मात्र, ‘आशिकी’ हा चित्रपट वगळता तिच्या इतर कोणत्याही चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. याच दरम्यान १९९९मध्ये अनु अग्रवालचा एक मोठा अपघात झाला. या अपघातामुळे अनु अग्रवालचे फिल्मी करिअरच नाही, तर तिचे आयुष्यही उद्ध्वस्त झाले. अनु अग्रवालला १९९६ दरम्यान वर्ल्ड टूर करायची होती. त्यावेळी अनु अग्रवालने वांद्रेतील घर आणि कार विकली. यातून आलेले पैसे घेऊन ती जगाच्या दौऱ्यावर गेली.
मात्र, १९९९मध्ये अनु अग्रवाल एका भीषण रस्ता अपघाताची शिकार झाली. या अपघातामुळे तिच्या चेहऱ्यावर, स्मरणशक्तीवर तर परिणाम झाला. तब्बल २९ दिवस कोमात राहिल्यानंतर अनु अग्रवालला शुद्ध आली खरी, पण तिची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती. शुद्धीत आल्यावर ती स्वतःला पूर्णपणे विसरली होती. या अपघातातून सावरायला तिला बरीच वर्षे घालवावी लागली. दुसरीकडे, तिची फिल्मी कारकीर्दही संपली होती.
स्मरणशक्ती गमावलेल्या अनु अग्रवालवर तीन वर्षे उपचार सुरू होते. यानंतर तिची स्मरणशक्ती परत आली. मात्र, नंतर तिने आपले आयुष्य योगाला समर्पित केले. अनु अग्रवाल अखेर १९९६मध्ये रिलीज झालेल्या आलेल्या 'रिटर्न ऑफ ज्वेलथीफ' या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत देव आनंद आणि धर्मेंद्र यांनीही काम केले होते. मात्र, अपघातानंतर अनु अग्रवालचा चेहरा खूप बदलला आणि तिला ओळखणे खूप कठीण झाले.
अभिनेत्री अनु अग्रवालने 'अनयुजवल: मेमोयर ऑफ अ गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड' या चरित्रात तिची कथा लिहिली आहे. सध्या अनु अग्रवाल ‘अनु अग्रवाल फाऊंडेशन’ या नावाने एक फाउंडेशन चालवत आहे. याअंतर्गत ती मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांना मोफत योग शिकवते.
संबंधित बातम्या