Happy Birthday Anil Kapoor : ८०च्या दशकात एक असा अभिनेता बॉलिवूडमध्ये आला, ज्याने आपल्या प्रत्येक पात्राने लोकांना आश्चर्यचकित केले. या अभिनेत्याने कधी 'ईश्वर'मध्ये निरागस भूमिका साकारली, तर कधी 'राम-लखन'मध्ये धूर्त पोलिस ऑफिसरची भूमिका केली. प्रत्येक पात्राशी जुळवून घेऊ शकणाऱ्या या अभिनेत्याचे नाव आहे अनिल कपूर. आज म्हणजेच २४ डिसेंबर रोजी अनिल कपूर आपला ६७वा वाढदिवस साजरा करणार आहे. अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवलं. पण, त्याच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या आधीच्या जीवनात त्याने खूप संघर्ष केला. त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, की त्या क्षणी आपण मोठा माणूस बनायचं अशी शपथ त्याने घेतली.
अनिल कपूरने एका शोमध्ये हा किस्सा सांगताना म्हटले की, आजही जेव्हा तो दिवस आठवतो तेव्हा डोळे भरून येतात. पण, त्याच्या आईने त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. अनिल कपूर म्हणाला की, 'लहानपणी मी सिल्कचा शर्ट आणि हाफ पँट घालायचो, जी माझी आई शिवायची. मी तेच कपडे एका पार्टीला घातले होते, जिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांनी माझ्या कपड्याची खिल्ली उडवली होती. मग मी रडायला लागलो आणि सगळ्यांसमोर म्हणालो की, एक दिवस मी पण मोठा माणूस, हिरो बनेन आणि छान कपडे घालेन.एक तो दिवस होता आणि एक आजचा आहे. मी इथे बसून त्या दिवसाची गोष्ट सांगत आहे. पण त्यादिवशी मला खूप राग आला होता आणि रडायलाही आले होते.' ही गोष्ट सांगताना अनिल कपूर भावूक होतो.
अनिल कपूरचे वडील सुरिंदर कपूर आणि पृथ्वीराज कपूर हे चुलत भाऊ होते. सुरिंदरला काम मिळवून देण्यासाठी अभिनेत्याने मुंबईला बोलावले होते. त्यावेळी सुरिंदर कपूर आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईत आले आणि राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहू लागले. सुरिंदर कपूर यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि चार मुले बोनी कपूर, अनिल कपूर, रीना कपूर आणि संजय कपूर होते. काही दिवसांनी त्यांनी भाड्याने घर घेतले आणि ते तेथे बराच काळ राहिले.
सुरिंदर कपूर यांना पृथ्वीराज कपूर यांनी 'मुघल-ए-आझम'मध्ये पहिली संधी दिली होती. या चित्रपटात ते सहाय्यक म्हणून काम करू लागले होते. काही वर्षांनी त्यांची मुले मोठी झाल्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीतही मोठे स्थान निर्माण केले. अनिल कपूरचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता 'वंश वृक्षम' , त्याचा हा चित्रपट १९८० मध्ये आला होता, जो तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. याआधी अनिल कपूरने 'हमारे तुम्हारे', 'एक बार कहो', 'हम पांच' आणि 'शक्ती'मध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते.
अनिल कपूरने १९८३मध्ये आलेल्या 'वो सात दिन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याची साधी शैली लोकांना खूप आवडली आणि हा चित्रपट हिट झाला. त्यानंतर अनिल कपूरने 'मशाल', 'मेरी जंग', 'तेजाब', 'मोहब्बत', 'जामबाज', 'कर्म', 'राम लखन', 'किशन कन्हैया', 'बेटा', 'मिस्टर इंडिया', 'जमाई राजा'सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनिल कपूर अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे आणि याशिवाय ओटीटीवर देखील सक्रिय आहे.
संबंधित बातम्या