Happy Birthday Aditya Roy Kapur: बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं नाव कमावलं आहे. तो १४ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत आणि या काळात त्याने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रुपेरी पडद्यावर रोमान्स आणि ॲक्शन भरपूर केली. पण, गेल्या १० वर्षांत आदित्य रॉय कपूरला एकही हिट चित्रपट मिळालेला नाही. आज (१६ नोव्हेंबर) आदित्य रॉय कपूर त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया.
आदित्य रॉय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात सहाय्यक भूमिकेतून केली होती. अजय देवगण आणि सलमान खानच्या ‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच छोटी होती. यानंतर त्याने 'गुजारिश' आणि 'ॲक्शन रिप्ले' सारख्या चित्रपटात काम केले, पण त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर आदित्य रॉय कपूरला एक चित्रपट मिळाला, ज्यामुळे तो रातोरात सुपरस्टार झाला. 'आशिकी २' असे या चित्रपटाचे नाव आहे.
२०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या या म्युझिकल लव्हस्टोरी चित्रपटातील त्यांची आणि श्रद्धा कपूर हिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, 'आशिकी २' ने जगभरात १०९ कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय केला होता. तर, हा चित्रपट अवघ्या १५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटाच्या यशाने आदित्य रॉय कपूरला यशाच्या शिखरावर पोहोचवले होते.
'आशिकी २' नंतर आदित्य रॉय कपूर 'ये जवानी है दिवानी'मध्ये दिसला होता, पण त्याने त्यात सहाय्यक भूमिका केली होती. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर आदित्य रॉय कपूरचे करिअर रुळावरून घसरले. 'दावत-ए-इश्क', 'फितूर', 'ओके जानू', 'कलंक', 'मलंग', 'राष्ट्र कवच ओम', 'गुमराह' हे सर्व चित्रपट फ्लॉप झाले आहेत. 'आशिकी २'च्या यशानंतर आदित्य रॉय कपूरचा एकही चित्रपट हिट झालेला नाही. दरम्यान आता अभिनेता ओटीटी विश्वात नशीब आजमावत आहे. त्याने ‘द नाईट मॅनेजर’ ही सीरिज गाजवली आहे.