अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काल म्हणजेच ३० मार्चला त्याचा नवाकोरा शो अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कपिल शर्मा पुन्हा एकदा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधून छोट्या पडद्यावर परतला आहे. मात्र, यावेळी तो एकटा नसून, अभिनेता सुनील ग्रोव्हरलाही पुन्हा एकदा सोबत घेऊन आला आहे. सुनील ग्रोव्हर ६ वर्षांनंतर कपिलच्या शोमध्ये परतला आहे. यामुळे आता कपिलच्या शोमध्ये प्रेक्षकांना कॉमेडीचा डबल डोस मिळणार आहे. यावेळी कपिलने टीव्हीऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आपला शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये कपिल आणि सुनीलने एकमेकांना टोमणे मारून भरपूर धमाल केली आहे.
कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा पहिला एपिसोड शनिवारी म्हणजेच ३० मार्च रोजी प्रसारित झाला. पहिल्या एपिसोडमध्ये सुनील ग्रोव्हरने शानदार एन्ट्री केली. ‘गुत्थी’ बनून प्रेक्षकांची मने जिंकणारा सुनील ग्रोव्हर यावेळी कपिलच्या शोमध्ये 'डफली'च्या भूमिकेत दिसला आहे. यावेळी सुनील ग्रोव्हरला एका बॉक्समधून थेट स्टेजवर डिलीव्हर करण्यात आलं. तर, कपिल शर्माने तो बॉक्स उघडताच, त्यातून ‘डफली’ची अवतारात सुनील बाहेर आला.
यानंतर, सुनील बॉक्समधून बाहेर येताच, तो आणि कपिल जुन्या गोष्टींवरून म्हणजे त्याच्या फ्लाईटमधील वादावरून एकमेकांना विनोदी पद्धतीने टोमणे मारू लागले होते. सुनीलला पाहताच कपिल म्हणाला की, ‘अशी मुलगी मी यापूर्वी कुठेतरी पाहिली आहे, असे का वाटते?’ यानंतर ‘डफली’च्या भूमिकेतील सुनील म्हणतो की, ‘मला वाटतं की मी तुला जेवण डिलिव्हरी करताना पाहिलंय?’ हे ऐकून कपिल म्हणतो की, ‘वाह, याचा अर्थ तू झ्विगॅटोही पाहिला आहे का?’ याला उत्तर देताना ‘डफली’ म्हणते की, ‘नाही, मी तो चित्रपट पाहिलेला नाही.’ दोघांचे बोलणे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसू लागले होते.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर-साहनी पाहुणे म्हणून आले होते. यावेळी सर्वांनी खूप धमाल केली. त्याचबरोबर कपूर कुटुंबाने अनेक रंजक किस्से शेअर केले.