Govinda admitted in hospital: बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदाला आज सकाळी त्याच्याच रिव्हॉल्व्हरने पायात गोळी लागल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र, याबद्दल आणखी माहिती समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला त्याच्याच बंदुकीतून गोळी लागली आहे. रिव्हॉल्व्हरचे लॉक उघडे राहिल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. या अपघातात गोविंदा जखमी झाला आहे. यानंतर गोविंदाला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेता गोविंदा सकाळी ५च्या सुमारास घरातून बाहेर पडत होता. त्याआधी त्याने आपली बंदूक साफ केली. मात्र, अभिनेता स्वतःची रीव्हॉलव्हर साफ करत असताना तिचे लॉक उघडेच राहिल्याने त्यातून गोळी सुटली. यामुळे जखमी झालेला अभिनेता सध्या मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्याच्या पायातून गोळी काढण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोविंदाची बंदूक आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर पोलीस या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत. गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. सध्या गोविंदा अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार आहेत.
गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी मीडियाला सांगितले की, अभिनेत्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. तो कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी गोविंदा रिव्हॉल्व्हर साफ करून कपाटात ठेवत होता. यादरम्यान पिस्तूल जमिनीवर पडले, आणि त्यातून गोळी सुटली. ही गोळी त्याच्या गुडघ्याखाली लागली. मात्र, आता घाबरण्याची गरज नाही.'
गोविंदाची मुलगी टीना आहुजाने फोनवर एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की, ‘मी सध्या माझ्या वडिलांसोबत आयसीयूमध्ये आहे. मी सध्या जास्त बोलू शकत नाही. पण हे नक्की सांगेन की, बाबांची तब्येत पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे. गोळी लागल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ऑपरेशन यशस्वी झाले. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या असून रिपोर्ट्सही चांगले आले आहेत. बाबांना किमान २४ तास आयसीयूमध्ये ठेवलं जाईल. आता घाबरण्याचं काही कारण नाही.’