मंगळवारी सकाळी परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळीबार केल्याने गोविंदा जखमी झाला. पायाला गोळी लागल्याने त्याला गोविंदाला जुहूयेथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तासाभराच्या शस्त्रक्रियेनंतर गोळी बाहेर काढण्यात आली. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून अजून काही दिवस त्याला रुग्णालयातच राहावे लागणार आहे. त्याचबरोबर पोलिसांनी त्याची परवानाधारक रिव्हॉल्व्हरही जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
गोविंदावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. रमेश अग्रवाल यांनी सांगितले की, गोळी काढण्यात आली असून अभिनेता बरा आहे. येत्या तीन ते चार दिवसांत गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मात्र, महिनाभर विश्रांती घ्यावी लागणार आहे. हॉस्पिटलमधूनच अभिनेत्याने आपल्या चाहत्यांसाठी एक ऑडिओ मेसेजही जारी केला, ज्यात त्याने संपूर्ण माहिती दिली. "मला गोळी लागली, पण ती बाहेर काढण्यात आली आहे. मी डॉक्टरांचे आणि सर्वांच्या प्रार्थनांचे आभार मानतो.
गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली. 'कोलकात्यात एक शो होता आणि मला सकाळी ६ वाजता फ्लाईट पकडायची होती. गोविंदा विमानतळाकडे निघणार होता, पण तेवढ्यात ही घटना घडली. देवाचे आभार की गोविंदाच्या पायाला दुखापत झाली आणि काहीही गंभीर घडले नाही. अभिनेत्याची पत्नी सुनीता आहुजा देखील कोलकात्यात होती आणि अभिनेता त्याच्या घरी एकटाच होता. शूटिंगची माहिती मिळताच सुनीता ही मुंबईला रवाना झाली.'
वाचा: ब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, गोविंदा आपली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना ती खाली पडली आणि त्याला गोळी लागली. अभिनेत्याने ताबडतोब पत्नी आणि मॅनेजरला याबाबत सांगितले. त्यानंतर मॅनेजर घरी पोहोचला आणि अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा ते तातडीने रुग्णालयात आले. त्यानंतर अभिनेत्याची मुलगी टीना आहुजादेखील रुग्णालयात पोहोचली.
गोविंदाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईतील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये सकाळी ११ वाजता पोहोचलेले शिवसेना सदस्य दीपक सावंत म्हणाले, "मी त्याच्या सर्व चाहत्यांना सांगू इच्छितो की तो पूर्णपणे ठीक आहे. काळजी करण्याची गरज नाही. तो एक अपघात होता. ४८ तासात त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डॉक्टरांनी आपलं काम चोख पार पाडलं आहे. त्याचे कुटुंबीय आत आहेत आणि ते सर्व गोविंदा लवकर बरा होत असल्याने आनंदी आहेत."