Happy Birthday Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदा ६१ वर्षांचा झाला आहे. २१ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्ट्रातील विरार येथे जन्मलेल्या गोविंदाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की, जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचे वडील अरुण आहुजा यांनी त्याला हात लावण्यासही नकार दिला होता. खुद्द गोविंदाने एका मुलाखतीदरम्यान हे सांगितले होते. गोविंदाने या मुलाखतीत सांगितले होते, ‘मी जेव्हा गर्भात होतो तेव्हा आई (निर्मला देवी) साध्वी बनली होती. ती बाबांसोबत राहायची, पण अगदी साध्वीसारखी... काही महिन्यांनंतर, जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा बाबांनी मला हात देखील लावला नाही. त्यांनी मला स्वीकारण्यास नकार दिला. त्यांना असे वाटले की माझ्यामुळेच आई साध्वी झाली आहे. मात्र, हळूहळू त्यांनी हा राग सोडला.’
गोविंदाने अभिनय विश्वात यावे असे त्याच्या आईला कधीच वाटत नव्हते. मात्र, त्याला या प्रवासात वडिलांची तितकीच साथ मिळाली. गोविंदा म्हणाला की, 'मी बँकेत काम करावे अशी आईची इच्छा होती. माझ्या वडिलांनीच मला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा दिली. त्यांनी मला सांगितले - ‘तू चांगले लिहू शकतोस, छान दिसत आहेस, अभिनय करू शकतोस. मग तू नोकरी का शोधत आहेस?’
या दरम्यान गोविंदा काही काळ आईला न सांगता राजश्री प्रॉडक्शनला भेट देत राहिला. कदाचित आपल्याला काही काम मिळेल असा विचार करून तो सतत तिथे जायचा. मग एके दिवशी त्याने आईला सगळं नीट समजावून सांगितलं. त्यानंतर आईने त्याला अभिनय विश्वात काम करण्याची परवानगी दिली.
यानंतर गोविंद रोशन तनेजा यांच्या अभिनय संस्थेत गेला आणि तिथे अभिनय शिकू लागला. विशेष म्हणजे त्यांनी गोविंदाकडून कोणतीही फी घेतली नाही. सरोज खान यांनी गोविंदाला नृत्य शिकवले, ज्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क आकारले नाही. फायटर मास्टर राम यांनी मारधाड शिकवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही. कारण फक्त एवढेच होते की, ते सगळे गोविंदाच्या कामाने प्रभावित झाले होते. गोविंदाने वयाच्या २१व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘हत्या’. हा होम प्रोडक्शन चित्रपट त्याचा मोठा भाऊ कीर्ती आहुजा याने दिग्दर्शित केला होता.
गोविंदाने १९८६मध्ये 'इलजाम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट दिले. 'राजा बाबू' (१९९४), 'कुली नंबर 1' (१९९७), ‘दुल्हे राजा’ (१९९८), 'बडे मियाँ छोटे मियाँ' (१९९८) आणि 'राजा बाबू' (१९९४) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना ९०च्या दशकांत त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.
मात्र, २०००पासून गोविंदाचा वाईट टप्पा सुरू झाला. 'भागम भाग' (२००६), 'पार्टनर' (२००७) यांसारख्या चित्रपटांतून त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. गोविंदाचा मागील चित्रपट 'रंगीला राजा' हा बॉक्स ऑफिसवर फारच फ्लॉप झाला होता.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गोविंदा मोठा झाल्यावर त्याने नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. वाणिज्य शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो एकदा मुंबईतील हॉटेल ताजमध्ये स्टुअर्टच्या नोकरीसाठी मुलाखतीसाठी गेला होता, पण त्याला नोकरी मिळाली नाही. गोविंदाने सांगितले होते की, ‘मला इंग्रजी येत नसल्याने ही नोकरी मिळाली नाही. मी मुलाखतीत इंग्रजीत बोललो नाही.’