Gharoghari Matichya Chuli Star Cast: सध्या मालिका विश्वात नव्या मालिका दाखल होत आहेत. अनेक नव्या मालिका आणि हटके कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका गाजवल्यानंतर आता ‘दीपा’ म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ मार्चपासून स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ज्या हृषिकेश बद्दल इतकं भरभरुन बोललं जातंय त्या हृषिकेषची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत हृषिकेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुमीत पुसावळे. सुमीतला याआधी आपण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलोय. मात्र हृषिकेश ही व्यक्तिरेखा त्याने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे.
वाचा: आलियाच्या कडेवरील राहाला पाहताच अनंत अंबानी झाला खूश, पाहा व्हिडीओ
घरोघरी मातीच्या चुली मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना सुमीत म्हणाला, ‘स्टार प्रवाह कुटुंबाचा सदस्य होतोय याचा मनापासून आनंद आहे. मी याआधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय. ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल उत्सुक आहे. या मालिकेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे. खूप चांगले कलावंत मालिकेत आहेत. एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. मला असं वाटतं एकत्र कुटुंब ही रणदिवे कुटुंबाती खरी ताकद आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की एक लाकडाची काठी तोडणं सोपं आहे मात्र लाकडाची मोळी तोडणं तितकंच अवघड. त्यामुळे कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे.
वाचा: 'अच्छा तो हम चलते हैं...', धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आरोही सांबरे ही ‘ओवी’च्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी आरोही सांबरे ‘स्टार प्रवाह’च्या ‘मुलगी झाली हो’, ‘शुभविवाह’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बालकलाकार आरोही सांबरे हिला अभिनयासोबतच नृत्याची आणि गाण्याची देखील आवड आहे. यासोबतच आरोही बॉक्सिंग आणि कराटेचं देखील प्रशिक्षण घेत आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतली ‘ओवी’ ही नवी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आरोही देखील खूपच उत्सुक आहे.
वाचा: नयनतारा पतीपासून विभक्त होणार? सोशल मीडियावरूनही अनफॉलो केल्याची चर्चा
नव्या मालिकेच्या कथानकात काय हटके असणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यामालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र, घराला घरातल्या आपल्या माणसांमुळे खऱ्या अर्थाने घरपण मिळतं. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’ असणार आहे. सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या कोऱ्या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून, राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.