Gharoghari Matichya Chuli 5 August 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या येत्या भागांमध्ये रंजक कथानक पाहायला मिळणार आहे. जानकी आणि हृषिकेशसह आता रणदिवे कुटुंबासमोर एक मोठं सत्य येणार आहे. या सत्यामुळे आता संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसणार आहे. इतकी वर्ष एकत्र असलेलं हे कुटुंब आता एका सत्यामुळे कोलमडून जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जानकी आणि हृषिकेश यांच्या आयुष्यात पार्वती नावाचं एक वादळ आलं होतं. या पार्वती बाई कोण आहेत? असा प्रश्न दोघांनाही पडला होता. मात्र, याबद्दल कुणाला विचारावं याबद्दल ते संभ्रमात होते. मात्र, आता स्वतः नाना याचं उत्तर देणार आहेत.
रणदिवे कुटुंबात नुकतंच हृषिकेश आणि जानकी यांचा लग्न सोहळा पार पडला आहे. या लग्न सोहळ्यादरम्यान ऐश्वर्याने अनेकदा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तिच्या प्रयत्नांत अयशस्वी ठरताना दिसत होती. पण, शेवटी तिचा डाव साध्य झाला आणि हृषिकेश जानकीच्या समोर पार्वतीचं नाव आलं. पार्वती कोण? तिचा नानांशी काय संबंध होता? नानांनी आपल्या आईला फसवलं का? असे अनेक प्रश्न जानकी आणि हृषिकेश यांच्या मनात पिंगा घालत होते. त्या दोघांनीही मिळून याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला होता. आता ते सत्याच्या जवळ पोहोचले आहेत.
नानांना हिम्मतराव काकांशी पार्वतीबद्दल बोलताना स्वतः जानकीने पाहिलं होतं. हीच गोष्ट तिने हृषिकेशला देखील सांगितली. यामुळे दोघांनाही जबर धक्का बसला होता. आता नानांना यबद्दल कसं विचारायचं या गोंधळात दोघेही होते. यानंतर हृषिकेशने नानांना एक पत्र लिहून त्यात आपल्या मनातील सगळे प्रश्न मांडले. आता नाना स्वतः सगळ्या कुटुंबासमोर हृषिकेशला त्याच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत. नानांनी आणि सुमित्रा आईने एकट्यातच हृषिकेशचं पत्र वाचलं आहे. आता दोघेही मिळून या पत्राचं उत्तर सगळ्यांसमोर देणार आहेत. पार्वती कोण याचा खुलासा आता होणार आहे.
जानकी आणि हृषिकेश ज्या पार्वती बाईंच्या शोधात आहेत, त्या पार्वतीबाई म्हणजे नानांच्या पहिल्या पत्नी आहेत. तर, हृषिकेश हा पार्वतीबाईंचा मुलगा आहे. मात्र, हे सत्य त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लपवून ठेवलं आहे. हृषिकेशच्या जन्माच्या वेळीच पार्वतीचं निधन झालं होतं. केवळ सुमित्राच्या वचनामुळे आजवर नानांनी कुणालाही ही गोष्ट सांगितली नव्हती. मात्र, आता नाना रणदिवे हे सत्य सगळ्यांना सांगणार आहेत.