Gharoghari Matichya Chuli 3 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या आजच्या भागात जानकी आणि ऋषिकेश यांच्या लग्नाची तयारी पाहायला मिळणार आहे. कुटुंब कलश कौल घेत आपल्या आई-वडिलांचं पुन्हा एकदा लग्न लावून दिलं जावं, असा हट्ट ओवीने धरला होता. अखेर तिच्या या हट्टापुढे घरातल्या सगळ्यांनीच नमतं घेतलं. आता रणदिवे कुटुंबात जानकी आणि ऋषिकेश यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचा लग्न सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा रणदिवेंच्या घरात सनई आणि चौघडे वाजू लागणार आहेत. मात्र, या सगळ्यातही ऐश्वर्या तिचा डाव खेळणार आहे.
हिम्मतरावांना नानासाहेबांच्या खोलीत जाताना पाहून ऐश्वर्याला आधीच शंका आली होती. दोन दिवसांपूर्वीच हिम्मतराव नानांकडून एक लाख रुपये घेऊन गेले, मग आता ते पुन्हा कशासाठी आले आहेत?, असा प्रश्न तिला पडला होता. दाराला कान लावून तिने नाना आणि हिम्मतरावांचं काही बोलणं ऐकलं. मात्र, ते काही तिच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे तिने हिम्मतरावांचा पाठलाग करत आश्रम गाठलं. हिम्मतराव यांच्या आश्रमात पोहोचल्यावर ऐश्वर्याने तिथल्या सिक्युरिटी गार्डकडे आश्रमाबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली. हे आश्रम नानासाहेबांचं आहे का?, असं तिने विचारलं. मात्र, यावर उत्तर देताना सिक्युरिटी गार्ड म्हणाला की, ‘हे आश्रम हिम्मतरावांचं आहे, तर नानासाहेब रणदिवे हे इथले देणगीदार आहेत. नानासाहेबांनी दिलेल्या पैशावरच आश्रम सुरळीतपणे चालतं.’
यावर ऐश्वर्या त्याला आणखी काही प्रश्न विचारू लागते. मात्र सिक्युरिटी गार्ड ‘हिम्मतरावांना येथे बोलावून आणतो, तुम्ही त्यांनाच काय ते विचारा’, असं म्हणत आतमध्ये त्यांना बोलवायला जातो. मात्र, हिम्मतराव आलेले पाहताच ऐश्वर्या तोंड लपवून तिथून पळ काढते. ही बाई नानासाहेबांबद्दल विचारपूस करत होती, हे कळतात हिम्मतराव हे नानांना कळवायला हवं असं म्हणत आतमध्ये निघून जातात. आता ऐश्वर्या घरी येऊन आजीला प्रश्न विचारणार आहे. हिम्मतराव हे नानांचे कोण लागतात आणि ते आपल्या घरात सतत का येतात? त्या पार्वती आश्रमाचं नक्की रहस्य काय? असे प्रश्न ऐश्वर्या आजीला विचारणार आहे.
यावर आजी आधी तिला उत्तर देण्यास नकार देणार आहे. मात्र, नंतर ती नानांच्या आयुष्याचं सगळं सत्य ऐश्वर्याला सांगणार आहे. एका राजाच्या दोन राण्या होत्या, असं म्हणत ती नानांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ऐश्वर्याला सांगणार आहे. नानांची पहिली पत्नी तिचा मुलगा ऋषिकेश असून, नानांच्या आत्ताच्या पत्नीपासून सौमित्र, सारंग आणि शर्वरी अशी तीन मुलं आहेत, हे सत्य आता ऐश्वर्याला आजीकडून कळणार आहे.
संबंधित बातम्या