Gharoghari Matichya Chuli 24 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे. रणदिवेंच्या घरात आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्न सोहळ्याची लगबग सुरू आहे. लग्नाच्या १०व्या वाढदिवसानिमित्ताने जानकी आणि हृषिकेश पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. हा त्यांच्या मुलीचा म्हणजे ओवीचा हट्ट होता. आपल्या चिमुकल्या लेकीचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी हृषिकेश आणि जानकी यांनी मिळून हा घाट घातला आहे. मात्र, हृषिकेश आणि जानकीचा हा लग्न सोहळा आनंदाने पार पडू द्यायचं नाही, असा विडा ऐश्वर्याने उचलला आहे. तिचं लग्न सौमित्रशी न झाल्यामुळे आता ऐश्वर्या चांगली चिडलेली आहे.
हृषिकेश हा सुमित्रा आईचा मुलगा नाही, ही गोष्ट आता ऐश्वर्याला कळलेली आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन आता ऐश्वर्या हृषिकेश आणि जानकी यांच्यासह संपूर्ण रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी नवा प्लॅन आखत आहे. यासाठी तिनं जानकीला हाताशी धरण्याचं ठरवलं आहे. ती सतत काहीना काहीतरी हिंट देऊन हृषिकेशबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, जानकीला यामागचं सत्य माहित नसतं. ऐश्वर्याच्या एका माणसानं नानांचा आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा म्हणजेच पार्वतीचा लग्नाचा फोटो आश्रमात पाहिलेला असतो. ही खबर त्याने ऐश्वर्याला देताच, ऐश्वर्या लगेच एक प्लॅन बनवून जानकीला मुद्दाम होऊन हिम्मतराव यांच्या आश्रमात पाठवते.
त्यावेळी जानकी देखील लग्नाचा फोटो बघून गोंधळून जाते. या फोटोत नाना असले तरी त्यांच्यासोबत सुमित्रा आई नाही, तर दुसऱ्याच कुणीतरी आहेत हे जानकीच्या लक्षात येतं. मात्र, तरीही जानकी शांत बसते. जानकीला शांत बसलेले पाहून आता ऐश्वर्या पुन्हा एकदा नवा प्लॅन आखत असते. यामध्ये ती हृषिकेश जन्माच्या काही गोष्टी सांगणारी फाईल या आश्रमात असल्याचं जानकीपर्यंत पोहोचवते. आता जानकी आणि हृषिकेश दोघेही या आश्रमात जाऊन शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, त्यांचा हा प्रयत्न देखील फोल ठरताना दिसणार आहे. यामुळे आता ऐश्वर्याला आणखी एक नवा प्लॅन करावा लागणार आहे.
दुसरीकडे, रणदिवे यांच्या घरात आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाचा संगीत सोहळा सुरू झाला आहे. या संगीत सोहळ्यात हृषिकेश आणि जानकी यांची लहानपणापासूनची मैत्री ते त्यांच्या हातावर आतापर्यंतच्या नात्याचा एक सुंदर प्रवास सगळेच मिळून सादर करणार आहेत. मात्र, या सगळ्या दरम्यान ऐश्वर्याच्या या आनंदावर आपण विरजण घालणारच, असं म्हणत एक नवा डाव खेळणार आहे. आता जानकी आणि हृषिकेश यांचा लग्न सोहळा मोडण्यासाठी ऐश्वर्या काय नवा प्लॅन आखणार? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या