Gharoghari Matichya Chuli 17 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या येत्या भागांमध्ये धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. हृषिकेश आणि जानकी यांच्या हळदीचा सोहळा आता येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. मेहंदी झाल्यानंतर हृषिकेशच्या मनात जानकी विषयी गैरसमज निर्माण झाले होते. आपल्या लॅपटॉपला कोणीतरी हात लावला आहे आणि ती व्यक्तीचे हात मेहंदीचे आहेत, हे कळल्यावर हृषिकेशला सुरुवातीला ऐश्वर्यावर संशय आला होता. मात्र, ऐश्वर्याच्या हातावर मेहंदीच नाहीये, हे बघून तो गप्प बसला होता. सगळ्यांपैकी मेहंदी केवळ जानकीच्या हातावर लागल्याचा ऐश्वर्या त्याला म्हणते. त्यावेळेस जानकीनेच आपला लॅपटॉप चेक केला, ही गोष्ट हृषिकेशच्या लक्षात येते.
दुसरीकडे, जानकीने नक्की लॅपटॉपवर काय केलं हे बघण्यासाठी हृषिकेश आपल्या लॅपटॉप तपासतो. तेव्हा त्याला सुमित्रा इंटरप्राईजेस अकाउंट चेक करण्यात आल्याचं लक्षात येतं. जानकीने असं नक्की का केलं असेल? असा प्रश्न आता हृषिकेशच्या मनात येत आहे. मात्र, जानकीवर असलेल्या विश्वासापोटी तो तिला काहीच म्हणणार नाही. तर, आपण हृषिकेशपासून काहीतरी लपवतोय याची सल जानकीच्या मनात कायम आहे. मेहंदीच्या कार्यक्रमानंतर ऐश्वर्याने रचलेल्या नाटकामुळे जानकीच्या हातावरची मेहंदी देखील पुसली गेली. मात्र, त्यावर असलेलं हृषिकेशचं नाव छान रंगलं होतं. त्यामुळे हृषिकेशने जानकीची समजूत घालून तिला शांत केलं.
आता जानकीच्या खोलीत एक माणूस काही सामान ठेवण्याचे निमित्ताने येणार आहे आणि तो तिला ‘आश्रमात जाऊन लाल रंगाची फाईल चेक कर, त्याच्यात तुला हृषिकेशबद्दल काहीतरी सिक्रेट माहिती मिळेल’, अशी टीप देणार आहे. त्यामुळे आता जानकी आपल्या लग्नाचा सोहळा सोडून आश्रमात कसं जाता येईल, याचा विचार करत आहे. दुसरीकडे रणदिवे कुटुंबात आता जानकी आणि हृषिकेश यांची हळद रंगणार आहे.
ऐश्वर्या हृषिकेश आणि जानकी यांना हळद लावताना मुद्दाम जानकीला उद्देशून म्हणणार आहे की, ‘जानकी वहिनी आता तुमच्या अंगाला हळद लागली आहे. आता घराबाहेर बिलकुलही पडू नका. नाहीतर अपशकुन होतो’, असं म्हणताच ऐश्वर्याचा हा टोमणा जानकीच्या लक्षात येणार आहे. मात्र, आपल्याला आश्रमात जायचं असल्याने बाहेर पडावचं लागणार, असा विचार देखील जानकीच्या मनात येतो. आता ती हळदीच्या अंगाने आश्रमात जाणार का? आणि हृषिकेशच्या जन्माचं हे सत्य तिच्यासमोर येणार का? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या