Gharoghari Matichya Chuli 12 August 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता एक नवा ट्वीस्ट येताना दिसणार आहे. ऐश्वर्या सारंगशी लग्न करून रणदिवे कुटुंबात आली असली, तरी तिने याच कुटुंबाचा बदला घेण्याचं मनात निश्चित केलं आहे. तिचे सगळेच डाव आता साध्य होताना दिसत आहेत. आधी तिने हृषिकेश आणि जानकी यांच्या आयुष्यात वाद निर्माण केला आहे. तर, दुसरीकडे ती सारंगपासून आपली सुटका कशी होईल याचा विचार देखील करतच होती की, आता तिची ही इच्छा देखील पूर्ण होणार आहे. मात्र, याचं खापर ती आता जानकीवर फोडणार आहे.
सारंगला ऑफिसमध्ये पाठवल्यानंतर, आता जानकीने त्याला बंगळूरूला कॉन्फरन्सला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जानकीने हा निर्णय अतिशय मनापासून घेतला होता. सारंगला सावत्रपणा वाटू नये, त्याला देखील कंपनीतील सगळ्या गोष्टी कळाव्यात, म्हणूनच जानकीने हृषिकेशला सारंगलासोबत घेऊन जाण्यास सांगितलं होतं. मात्र, काही कारणांमुळे हृषिकेश हा या कॉन्फरन्सला जाऊ शकणार नव्हता. तर, सारंग एकटाच ही कॉन्फरन्स अटेंड करून येईल, असं सगळ्यांनी ठरवलं. सारंगसाठी हा एक नवीनच अनुभव असणार होता. यासाठी तो देखील खूपच आतुर झाला होता.
आपली बॅग वगैरे भरून सारंग आता बंगळूरूला जाण्यासाठी निघाला आहे. मात्र, सारंग बंगळूरूला जाण्यासाठी कोणत्याही विमानाची तिकीटं मिळाली नाहीत. त्यामुळे आता त्याला ट्रेननेच बंगळूरूला जावं लागणार आहे. सारंग आता ट्रेननेच प्रवासासाठी निघणार आहे. मात्र, त्याच्या ट्रेनचा वाटेत मोठा अपघात होणार आहे. या अपघातात दोनशे लोक मृत्युमुखी पडल्याची बातमी सगळ्यांच्या कानावर पडणार आहे.
अपघाताची ही बातमी बघताच हृषिकेश आणि जानकीसह रणदिवे कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. या अपघातात सारंगला काही झालं तर नसेल ना, या विचारांनी सगळेच घाबरून गेले आहेत. आता हृषिकेश तातडीने हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेणार आहे. सारंग सुखरूप आहे की नाही, हे अजूनही समोर आलेलं नाही. मात्र, सारंग सुखरूप असावा अशीच प्रार्थना सगळे करताना दिसत आहेत. दुसरीकडे, आता ऐश्वर्याला एक नवीन बहाणा मिळाला आहे. ‘सारंगला जाण्यासाठी विमानाची तिकीट मिळत नव्हती, तरीही तुम्ही त्याला ट्रेनची तिकीट काढून पाठवलं. आता जर तो सुखरूप घरी आला नाही, तर त्याच्यासाठी जबाबदार तुम्हीच असाल’, असं म्हणत ऐश्वर्या आता जानकीला धारेवर धरणार आहे.