Gharoghari Matichya Chuli 10 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. रणदिवे कुटुंबात आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाची तयारी जोशात सुरू झाली आहे. लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिम आणि लेक ओवीच्या हट्टापायी हृषिकेश आणि जानकी पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार आहेत. मोठ्या थाटामाटात आणि साग्रसंगीतपणे जानकी आणि हृषिकेश यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. नुकतीच रणदिवे कुटुंबांने देवाकडे पत्रिका ठेवून आपल्या मुलाचं लग्न आणि हा सोहळा सुखरूप पार पडू दे, असं मागणं मागितलं.
मात्र, यावेळी देवीने डावा कौल दिल्याने सुमित्रा आई आणि नाना चांगलेच टेन्शनमध्ये आले होते. परंतु, हृषिकेशने आईची समजूत काढत, तिला काही होणार नाही, सगळं काही आनंदात होईल, असं म्हणत घरी नेलं. यानंतर आई-नाना आणि हृषिकेश-जानकी यांनी मिळून आपल्या लग्नाची पत्रिका ओवीला देखील दिली. लग्नाला हजर राहून प्रत्येक फोटोत उपस्थित राहावे, अशी गंमतीशीर विनंती त्यांनी आपल्या मुलीला केली. यामुळे आता ओवीचा राग देखील निवळला आहे. दुसरीकडे, लग्नाचा दिवस जसा जवळ घेतोय, तसतसं हृषिकेश जानकीला एक एक गिफ्ट देत चालला आहे.
आधी त्याने जानकीला गुलाब, सोन्याच्या बांगड्या आणि काही वस्तू दिल्या. तर, आता लग्नाच्या निमित्ताने तो सार्थककडून जानकीसाठी एक खास डिझायनर साडी बनवून घेणार आहे. या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही साडी जानकीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असणार आहे. या साडी सोबतच हृषिकेश जानकीला कानातले झुमके देखील देणार आहे. मात्र, ऐश्वर्याला हे सगळं बघत नाहीये. जानकी माझ्यापेक्षा महागडी साडी नेसू शकणार नाही, याची काळजी मी घेईन, असं म्हणत ऐश्वर्या जानकीच्या कपाटातून सार्थकने डिझाईन केलेली साडी काढून, तिथे एक स्वस्त साडी ठेवते. मात्र, दोन्ही साडींचे बॉक्स एक सारखेच दिसत असल्याने कुणाला याचा संशय येत नाही.
दुसरीकडे नाना रणदिवे आता हिम्मतवांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. हिम्मतरावांचं घर हे आश्रमातच आहे. ‘हिम्मतराव काका घरी आले होते आणि त्यांना चक्कर आली होती. त्यांची तब्येत ठीक नाही’, असं जानकी नानांना सांगते. म्हणून हिम्मतरावांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी नाना रणदिवे आश्रमात पोहोचणार आहे. हिम्मतरावांच्या खोलीत गेल्यावर त्यांची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोवर पडणार आहे. हा फोटो नानांच्या पहिल्या लग्नाचा आहे. हा फोटो बघून नानांना देखील मोठा धक्का बसणार आहे. काल जानकी इथे येऊन गेली होती. तिने हा फोटो तर पाहिला नसेल ना? या विचाराने आता नानांच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे.
संबंधित बातम्या