Gharoghari Matichya Chuli 1 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या मालिकेतील हृषिकेश आणि जानकीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत आज सौमित्र आणि अवंतिकाच्या लग्नातील राडा पाहायला मिळणार आहे. आता जानकी आणि हृषिकेश दोघेही आईला घेऊन सौमित्रच्या लग्नाला पोहोचले आहेत.हृषिकेश आणि जानकी यांनी आईला सौमित्रच्या लग्नाला नेण्यासाठी घरात सगळ्यांनाच खोटं सांगितलं आहे. हृषिकेश आणि जानकी आईला घेऊन सौमित्रच्या लग्नाला चालले आहेत, ही गोष्ट नानांना देखील ठाऊक नाही.
आईच्या नावाने एक नवीन कंपनी सुरू करायची आहे, त्यामुळे त्याच्या काही पेपरवर तिच्या सह्यांची गरज आहे, म्हणून तिला ऑफिसमध्ये यावं लागेल, असं हृषिकेश घरी सगळ्यांना सांगतो. तर, नाना देखील यासाठी होकार देतात. आता आई एकटी कशी ऑफिसमध्ये येणार, म्हणून हृषिकेश जानकीला देखील सोबत चालण्यास सांगतो. काम झाल्यावर आई आणि जानकी दोघी एकत्र घरी येतील, असं म्हणून तो दोघींनाही घेऊन बाहेर पडतो. आपण सौमित्रच्या लग्नाला जातोय, ही गोष्ट आईला देखील माहित नसते. गाडी ऑफिसला न जाता घराच्या जवळील मंदिराच्या दिशेने जातेत, हे लक्षात येताच आई हृषिकेश आणि जानकीला ‘आपण कुठे चाललोय? हा तर मंदिराकडचा रस्ता आहे ना?’, असं विचारू लागतात.
त्यावेळी आपण सौमित्र भाऊजींच्या लग्नाला चाललो आहोत, असं जानकी तिला सांगते. हे ऐकल्यानंतर आईच्या काळजात धस्सं होतं. नानांना ही गोष्ट कळली, तर ते खूप चिडतील अशी भीती आईला होती. मात्र, नाना नाही तर किमान आईला तरी तुला आशीर्वाद देण्यासाठी घेऊन येऊ, असे वचन आम्ही सौमित्रला दिल्याचे हृषिकेश आणि जानकी सांगतात. आता जानकी घाई गडबडीत आपला फोन घरीच ठेवून बाहेर निघाली आहे. त्यामुळे आता मोठा गोंधळ निर्माण होणार आहे.
सौमित्रचं लग्न दोन दिवसांनी असल्याचं जानकीने घरात सगळ्यांना सांगितलं होतं. मात्र, आता जानकीच्या फोनवर सौमित्रचा फोन आल्यानंतर त्याचं लग्न आजच आहे, ही गोष्ट ऐश्वर्याला कळणार आहे. संतापलेली ऐश्वर्या आता नानांना घेऊन थेट मंदिरात पोहोचणार आहे. दुरूनच सौमित्रला आशीर्वाद देणारी आई नानांना दिसणार आहे. तर ऐश्वर्या आता आगीत तेल टाकून नानांचा राग भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र, जानकी या परिस्थितीतही नानांचं मन वळवण्यात यशस्वी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्याचा प्लॅन धुळीस मिळणार आहे.
संबंधित बातम्या