Gharoghari Matichya Chuli 1 August 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या आजच्या भागात हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नानंतर आता वेगवेगळे सोहळे रंगताना दिसणार आहेत. ऐश्वर्याने किती खोडा घालण्याचा प्रयत्न केला असला, तरी हृषिकेश आणि जानकी यांचं लग्न पार पडलं आहे. मात्र, या दरम्यान जानकीने स्वतःच्या कानांनी नानांचं आणि हिम्मतराव काकांचं बोलणं ऐकलं आहे. नाना काकांना पार्वती विषयी सांगत असताना, जानकी दाराबाहेरून ते ऐकते. नानांच्या तोंडून हे ऐकून जानकीला धक्का बसला आहे. आता ही गोष्ट हृषिकेशला कशी सांगायची, याचा विचार ती करत आहे.
जानकीला आता सगळं कळलं आहे हे आता ऐश्वर्याने हेरलं आहे. त्यामुळे ऐश्वर्या आता हीच गोष्ट धरून तिचा नवा प्लॅन बनवत आहे. हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नानंतर रणदिवे कुटुंबात गोंधळाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या गोंधळाच्या कार्यक्रमावेळी ऐश्वर्या मुद्दामहून पार्वतीचं नाव घेणार आहे. मात्र, ऐश्वर्याने पार्वतीचं नाव कसं काय घेतलं? हा प्रश्न आता घरातील सगळ्यांनाच पडला आहे. यामुळे रणदिवेंच्या घरातील सगळेच थक्क झाले आहेत. पार्वती बाई कोण आहे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. नाना यामुळे टेन्शनमध्ये आले आहेत. हृषिकेश देखील पार्वतीचं नाव ऐकून गोंधळात पडली आहे.
ऐश्वर्याला याबद्दल माहित आहे, हे आता जानकीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जानकी ऐश्वर्याला किचनमध्ये अडवून ‘तू पार्वतीला कसं ओळखतेस? काय खरं आहे? तू मुद्दाम ह्या गोष्टी करतेस का? आत्ताच सांग नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील’, असं म्हणत असते. इतक्यात तिथे सुमित्रा आई येते. सुमित्रा आई आल्याचे बघून ऐश्वर्या तिथून गुपचूप काढता पाय घेते. तर, जानकी देखील विषय टाळायचा प्रयत्न करते. मात्र, सुमित्रा आई जानकीला विचारते की, ‘तुम्हा दोघींचं काय चाललं होतं?’ त्यावेळेस जानकी मुद्दामहून बोलते की, ‘ऐश्वर्याने कोणत्या पार्वतीचं नाव घेतलं, मी तेच विचारत होते तिला...’
त्यावर सुमित्रा आई पटकन म्हणते की, ‘तिने चुकून घेतलं असेल पार्वतीचे नाव. तिला कुठे माहिती आहे की, पार्वती कोण आहे?’ सुमित्राआईच्या तोंडून हे ऐकताच आता जानकीला मोठा धक्का बसला आहे. या पार्वती बाईबद्दल सुमित्रा आईला देखील माहित आहे, हे आता जानकी आणि हृषिकेश या दोघांनाही कळणार आहे. इतके दिवस नाना सुमित्रा आईना फसवून दुसऱ्याच एका बाईबरोबर संसार करत आहेत, असं जानकी आणि हृषिकेश यांना वाटत होतं. मात्र, आता त्यांची ही शंका फोल ठरली आहे. पार्वतीचं सत्य नाना हृषिकेश आणि जानकी यांना सांगणार का? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये कळणार आहे.