छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सिझन हा सर्वांसाठी अतिशय वेगळा ठरला आहे. या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहे. त्यासोबतच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच इन्फ्लूएंसर देखील दिसत आहेत. त्यात महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घन:श्याम दरवडेचा देखील सहभाग आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात घन:श्यामने थेट बिग बॉसला धमकी दिली आहे.
'बिग बॉस'च्या घरात मराठी बोलण्याची सक्ती असते. तसेच दिवसा न झोपण्याचा नियम हा आहेच. पण काही स्पर्धक हा नियम मोडताना दिसतात. रॅपर आर्य ही बिग बॉसच्या घरात दिवसा गच्चीवर जाऊन झोपली आहे. ते पाहून छोटा पुढारी घन:श्याम दरवडे चिडतो. बिग बॉसने आर्या झोपलेली असताना कुकुडू कू कसा वाजवला नाही असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर तो थेट कॅमेरा समोर येतो आणि बिग बॉसला कुकुडू कू वाजवण्याची धमकी देतो.
बिग बॉस सगळ्यांना न्याय समान हवा. नियमांचे उल्लंघन होत नाही का आता? आता कुकुडू कू वाजायलाच पाहिजे. आर्या ताई वरती झोपलेली आहे. दिवसा झोपायला परवानगी नाही. कुकुडू कू वाजवा नाही तर मी कानात जाऊन कुकुडू कू करेन. नाही तर मग मी जर झोपलो आणि कुकुडू कू वाजला तर मग तुम्हालाही माहिती आहे पुढाऱ्यांची स्ट्रॅटर्जी फार वेगळी असते. मग किती कोंबडे कानात आणून सोडले तरी मी उठायचो नाही.
गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एण्ट्री सर्वांनाच चकीत करणारी ठरली. छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडे. घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक पुढारी आहे.
वाचा: 'आगाऊ नको, डांबरट नको…', छोट्या पुढारीने घेतली निक्की तांबोळीची फिरकी
पहिल्यांदाच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामधील कोणत्या स्पर्धकाचा प्रवास आज संपणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.