Ghaath: जगभर गाजलेला 'घात' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, धडकी भरवणारा ट्रेलर पाहिलात का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ghaath: जगभर गाजलेला 'घात' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, धडकी भरवणारा ट्रेलर पाहिलात का?

Ghaath: जगभर गाजलेला 'घात' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, धडकी भरवणारा ट्रेलर पाहिलात का?

Published Sep 20, 2024 11:39 AM IST

Ghaath Movie Release: दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांच्या घात सिनेमाचा धडकी भरवणारा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो.

Ghaath Movie Release
Ghaath Movie Release

Ghaath Cinema Review:  साता समुद्रापार बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमांचा डंका वाजवणारा 'घात' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांच्या घात सिनेमाचा धडकी भरवणारा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा आधारित आहे.

शिलादित्य बोरा यांची ''प्लॅटून वन', मनीष मुंद्रा यांची 'दृश्यम फिल्म्स' आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘घात’ सिनेमाची स्टारकास्टही अगदी तगडी आहे. यातील कलाकार हे फक्त स्टार नसून खरेखुरे अभिनेते आहेत. मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम यांनी सिनेमात काम केलेलं आहे. तर उदित खुराणा यांनी या सिनेमाची सिनेमेटोग्राफी केली आहे,. नेटफ्लिक्सवरची 'द हंट फॉर वीरप्पन' ही डॉक्युमेंट्री तसेच आणि हुमा कुरेशी स्टारर 'बयान' असे तगडे प्रोजेक्ट नुकतेच पूर्ण केलेल्या खुराणांची सिनेमेटोग्राफी हेही 'घात'चं आणखी एक वेगळेपण आहे.

भारतातील रिलीजबद्दल लेखक-दिग्दर्शक छत्रपाल निनावे विशेष उत्सुक आहे. “घात हा एक खोल आशय असलेला सिनेमा आहे. विश्वासघात आणि कुणीतरी दगा दिल्यावर होणारा जीवघेणा त्रास या दोन्हीचं चित्रण करणारा ‘घात’महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागात घडतो जिथे कायद्याचं राज्य तर आहे पण अंमल नाही. जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी भयप्रद काहीतरी धोकादायक दडलेलं असू शकतं, अशी भीती असते. तरीही तिथे जीवनाचा एक प्रवाह चाललेला आहे. तिथल्या आयुष्यातली नैतिक-अनैतिकता निराळी आहे. त्यांच्या दुविधा निराळ्या आहेत, त्यातून आकार घेणारं जगणं निराळं आहे. त्यामुळेच अनेक भावभावनांचं मिश्रण असलेली ही कथा भारतीय प्रेक्षकांसमोर आणताना मी विशेष उत्सुक आहे. या सिनेमाद्वारे एका निराळ्या वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी मी प्रेक्षकांना आमंत्रित करतो आहे. घात-जिथे विश्वास दुर्मीळ आहे आणि तिथल्या जीवाची किंमत पावलापावलावर मोजावी लागते.असं निनावे यांनी म्हटलं आहे.

‘घात’ या १२४-मिनिटांच्या क्राईम थ्रिलरची निवड भारतातील फिल्म बाजार येथील वर्क-इन-प्रोग्रेस लॅबसाठी करण्यात आली होती. जिथे सिनेमाने लॅब अवॉर्ड मिळवलं. तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील GWFF बेस्ट फर्स्ट फीचर अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले होते. या चित्रपटाचा भारतातील प्रीमियर Jio MAMI 2023 आणि त्यानंतर केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) झाला. येत्या २७ सप्टेंबरला महाराष्ट्रभरात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

याबाबत बोलताना चित्रपटाचे निर्माते शिलादित्य बोरा म्हणतात, "घात हा एक अनवट हिरा आहे. एक निर्माता म्हणून, मी नेहमीच वेगळ्या सिनेमांकडे आकर्षित होतो. खरोखरच आपल्या मातीतल्या गोष्टी जगापुढे आणणारा 'घात' हा असाच एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे, तो थिएटरमध्ये पाहण्याचा अनुभव वास्तवाइतकाच खास असेल असा मला विश्वास आहे असं बोरा म्हणतात. ९० व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री असलेला ‘न्यूटन’, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-विजेता ‘पिकासो’, मराठी जापनीज रॉमकॉम ‘तो, ती आणि फुजी’आणि हुमा कुरेशीचा आगामी ‘बयान’आदी प्रोजेक्टसाठी शिलादित्य बोरा यांनी निर्माता म्हणून भूमिका बजावलेली आहे.

Whats_app_banner