काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. 'लाईक आणि सबस्क्राईब' असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता. तेव्हापासूनच ही अभिनेत्री कोण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर या गोष्टीवरून पडदा उठला असून ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आहे. ती या चित्रपटातील एका गाण्यात डान्स करताना दिसणार आहे.
नुकतेच 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटातील पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात अमेय वाघ आणि गौतमी पाटीलचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल असणाऱ्या 'लिंबू फिरवलंय' या भन्नाट गाण्याला अमितराज यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. पॅनारॉमा म्युझिक लेबल असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांनी केले आहे.
प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे ऐकायला जितके जल्लोषमय आहे, तितकेच ते पाहायलाही कमाल आहे. 'लिंबू फिरवलंय' या गाण्याच्या निमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर तिचा जलवा दाखवणार आहे. त्यामुळे आपल्या नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील या गाण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्या ने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब' चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आ हे.
वाचा: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?
या गाण्याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरुकर म्हणतात, "एक धमाल गाणे असायलाच हवे, असा अट्टाहास असल्याने 'लिंबू फिरवलंय' एक दमदार गाणे 'लाईक आणि सबस्क्राईब' मधून आम्ही घेऊन आलो आहोत. तुफान वाजणारे हे गाणे अतिशय कमाल चित्रित करण्यात आले आहे. संगीत टीम, नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. त्यात गौतमी पाटीलचा ठसकेबाज परफॉर्मन्स या गाण्यात अधिकच रंगत आणतो. त्यामुळे पुढे हे गाणे प्रत्येक समारंभात नक्की वाजेल, याची खात्री वाटते."