Happy Birthday Gauri Khan: बॉलिवूडचा बादशहा आणि अभिनेता शाहरुख खान याची पत्नी, प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर गौरी खान आज म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी तिचा ५३वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुख आणि गौरीने त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा गौरी अवघ्या १४ वर्षांची होती आणि शाहरुख १८ वर्षांचा होता. दोघांनीही घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले होते. मात्र, नंतर गौरी खानच्या कुटुंबीयांनी या नात्याला मान्यता दिली होती. या जोडीला आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान अशी तीन मुले देखील आहेत.
शाहरुख खान आणि गौरी दोघांच्या लग्नाला तब्बल ३२ वर्षे झाली आहेत. आपल्या एका मुलाखतीदरम्यान, शाहरुखने आपल्या डेटिंगच्या काळाला उजाळा देताना म्हटले होते की, तो गौरीच्या मनात जागा मिळवण्यासाठी तिच्या घराखाली किंवा त्या जवळच्या रस्त्यांवर उभा राहून तिच्यासाठी गाणी गायचा. शाहरुख आणि गौरी कॉलेजपासूनच एकमेकांना ओळखतात.
शाहरुखने स्वतः आपली लव्हस्टोरी सांगताना म्हटले होते की, ‘१९८४मध्ये जेव्हा मी १८ वर्षांचा होतो, तेव्हा त्या वयात प्रत्येकजण जे करतो, तेच मी करत होतो. मला एक मुलगी खूप आवडायची. त्यावेळी आमचं नातं नुकतंच सुरू झालं होतं. त्या मुलीचं नाव गौरी होतं. ती पंचशीलला राहायची आणि मी हौज खासमध्ये राहायचो. तिला भेटण्यासाठी मी तिच्या घराजवळ जाऊन तिच्यासाठी गाणे म्हणायचो. कारण, त्याकाळी आम्हाला भेटण्याची संधी मिळणं, तसं खूपच अवघड होतं, म्हणून मी फक्त तिच्या घराखाली जाऊन तिच्यासाठी 'गोरी तेरा गांव बडा प्यारा, मैं तो गया मारा, आके यहाँ रे' हे गाणे गायचो.
शाहरुख खानने २०१९मध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तो काही वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. त्यावेळी त्याला मुंबईत येऊन गौरीला शोधायचं होतं. शाहरुखने पुढे म्हटले की, गौरी त्याच्यावर रागावून दिल्लीहून मुंबईला गेली होती, त्यामागील मोठे कारण म्हणजे शाहरुख तिच्याबद्दल खूप पझेसिव्ह झाला होता. मात्र, गौरी मुंबईत कुठे राहते, हे देखील शाहरुख खानला माहीत नव्हते, याची कबुली त्याने स्वतः दिली. अशा परिस्थितीतही त्याने आपल्या मित्रांसोबत मुंबईला जाण्याचा बेत आखला. इतकंच नाही, तर भल्या मोठ्या मुंबईत त्याने गौरीला शोधून देखील काढलं होतं.