मुंबईत स्वत:च्या हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांचे असते. पण हे स्वप्न सर्वांचे पूर्ण होतेच असे नाही. कारण मुंबईतील घरांचे भाव हे आकाशाला भिडणारे असतात. त्यामुळे म्हाडाची लॉटरी ही सर्वसामान्यांसाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुवर्णसंधी असते. म्हाडाच्या लॉटरीचे फॉर्म सुरु झाले की सर्वजण ते भरताना दिसतात. मग त्यामध्ये सर्वसामान्यांपासून ते बड्या कलाकारांपर्यंत सर्वजण असतात. आता अभिनेता गौरव मोरेला म्हाडाची लॉटरी लागली आहे. पण त्याच्या घराची किंमत ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल.
मुंबईतील विविध भागात यंदा म्हाडाने २०३० घरे जाहीर केली होती. ही घरे मिळवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोक प्रयत्न करत होते. त्यामध्ये मग पत्रकार असतील, कलाकार असतील, सर्वसामान्य देखील असतील. यावेळी म्हाडाच्या घराच्या लॉटरीचा अर्ज भरण्याचा अनेक कलाकारांनी प्रयत्न केला. तसेच गोरेगावमधील दोन घरांसाठी तब्बल २७ कलाकारांनी देखील प्रयत्न केला होता. त्यामधील एकाच अभिनेत्रीला हे घर लागले आहे.
अभिनेता गौरव मोरे आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांनी पवई येथील घरासाठी म्हाडा लॉटरीचा अर्ज भरला होता. पवईमधील म्हाडाच्या एचआयजी श्रेणीतील घरांसाठी दोघांकडूनही अर्ज करण्यात आला होता. पवईतील या उच्च श्रेणीतील घरांची किंमत जवळपास १ कोटी ७८ लाख रुपये आहे.
वाचा: पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?
गोरेगाव येथील म्हाडाच्या घरासाठी २७ कलाकारांनी अर्ज केला. त्यामध्ये बिग बॉस मराठी पर्वतींचा विजेता विशाल निकम , लेखक निर्माता निपुण धर्माधिकारी , अभिनेत्री गौतमी देशपांडे , नारायणी शास्त्री , अभिनेत्री किशोरी विज , रोमा बाली , तनया मालजी , अनिता कुलकर्णी , संचित चौधरी , शेखर नार्वेकर यांनी अर्ज केला होता. त्यामधील गोरेगावचं घर अभिनेत्री गौतमी देशपांडेला मिळाले आहे. त्याचप्रमाणे कन्नमवार नगरमधील घर हे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने याला मिळाले आहे. कन्नमवार नगरमधील घराची किंमत ही ४० लाख रुपये असल्याची चर्चा आहे. तसेच गौतमीच्या गोरेगावमधील घराची किंमत अद्याप समोर आलेली नाही. मात्र, गौरव मोरे आणि शिव ठाकरेच्या घराची विशेष चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या