आजकाल मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. नुकताच 'अल्याड पल्ल्याड' हा भयपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या चित्रपटाच्या कमाईची माहिती समोर आली आहे.
'अल्याड पल्ल्याड' हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला. त्याच वेळी कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' देखील प्रदर्शित झाला. या हिंदी चित्रपटाला 'अल्याड पल्ल्याड' टक्कर देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या चित्रपटातील अभिनेता गौरव मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'अल्याड पल्ल्याड' चित्रपटाची आतापर्यंतची कमाई सांगितली आहे.
वाचा: शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे
गौरवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'अल्याड पल्ल्याड' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर चित्रपटाने आता पर्यंत ३ कोटी ६९ लाख रुपयांची कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हे पोस्टर शेअर करत गौरवने रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत. रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज मराठीत अभावानेच पाहायला मिळतं. ‘अल्याड पल्याड’ च्या निमित्ताने एक वेगळा चित्रपट पाहायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षक व्यक्त करताहेत.
वाचा: अद्वैतने सर्वांसमोर कलाच्या गळ्यात घातले मंगळसूत्र, आजच्या भागात काय घडणार?
आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे.
वाचा: 'या' कारणामुळे वर्षातून ६ महिने आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर
अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटालाही मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर या शहरांतून चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. २०० हून अधिक चित्रपटगृहांतून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत सगळ्या वर्गामध्ये उत्सुकता पहायला मिळतेय.