Gashmir Mahajani Struggle Story : आपला दमदार अभिनय आणि हटके अंदाज यामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. ‘देऊळ बंद’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा मराठी चित्रपटांसह काही हिंदी मालिकांमध्ये झळकलेला गश्मीर नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. बरेचदा सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांशी गप्पा देखील मारतो. गेल्या काही महिन्यांपासून गश्मीरला ट्रोलर्सचा देखील सामना करावा लागला. गश्मीरचे वडील रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्यानंतर अशा अनेक गोष्टी समोर आल्या ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील वैयक्तिक वाद चव्हाट्यावर आले. यानंतर गश्मीरला अनेक प्रकारच्या ट्रोलर्सना तोंड द्यावे लागले.
मात्र, या सगळ्यात देखील त्याने स्वतःला खंबीर ठेवले आणि आपले काम सुरू ठेवले. गश्मीरनं नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली यामध्ये त्याने आपल्या आयुष्यातील एका कठीण काळाविषयी काही गोष्टी शेअर केल्या. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना आपल्याला दारूचं व्यसन लागलं होतं आणि त्यामुळे आपण नैराश्यात गेलो होतो, असा मोठा आणि खळबळजनक खुलासा गश्मीरने केला. माझं कुटुंब आणि माझी आई यांनी मला या सगळ्यात खूप पाठिंबा दिला, त्यामुळे मी त्यातून बाहेर पडू शकलो, असे गश्मीर म्हणाला.
आपल्या संघर्ष काळाचा किस्सा सांगताना गश्मीर म्हणाला की, ‘त्या दरम्यान मी एकही चित्रपट केला नव्हता. मात्र, त्याआधीच मी लग्न केलं. मी खूप कठीण काळातून जात होतो आणि लग्नासारखा मोठा निर्णय घेतला होता. त्यामागेही कारण होतं. मला गौरी आवडली होती आणि तिच्या सोबत लग्न करण्याचा निर्णय मी घेतला होता. पण दरवेळी हाच विचार करायचो की, थोडं काम करू, चार पैसे येऊ देत, मग लग्न करेन. पण, एका क्षणाला मला असं वाटलं की, लग्न केलं की घरात चार पैसे येतील आणि त्यानंतर आपल्याला सिनेमावर लक्ष केंद्रित करता येईल. अनेकांनी मला असेही सल्ले दिले की, लग्न केल्यानंतर आयुष्यात भावनिक स्थैर्य येईल. पण, हा प्रवास वाटतो तितका सकारात्मक देखील नव्हता.’
गश्मीर पुढे म्हणाला की, ‘वयाच्या पंधराव्या वर्षी मी बरंच काम केलं. १५ ते १७ या दोन वर्षात माझ्याकडे बऱ्यापैकी काम होतं. पण, त्यानंतर जवळपास पुढचे तीन वर्ष मी नैराश्यातच गेलो होतो. त्यानंतर नैराश्यातून बाहेर पडत असताना पुढची सात-आठ वर्ष मी आणखी चांगलं काम केलं. पण, परत २४व्या वर्षानंतर माझ्या आयुष्यात असा एक काळ आला की, मी पूर्णपणे नैराश्यात बुडून गेलो. अगदी दिवसभर दारूचा ग्लास तोंडाला लागलेला असायचा. इतकंच नाही तर सहा महिने मी स्वतःला एका रूममध्ये बंद केलं होतं. ना बाहेर जायचो, ना कोणाचे फोन उचलायचो. सगळं काही बंद झालं होतं.’
या मागचं कारण सांगताना गश्मीर म्हणाला की, ‘त्याआधी मी एका चित्रपटाची निर्मिती केली होती. सुहास शिरवळकर यांच्या एका कथेवर आधारित ’नील डिसोझा परत आलाय' असा तो चित्रपट होता. त्याची निर्मिती आणि दिग्दर्शनही सांभाळलं होतं. माझ्याबरोबर आणखी एक सहनिर्माते देखील होते. मात्र, चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना त्यांचं निधन झालं. मी घरावर कर्ज काढून तो चित्रपट पूर्ण केला, पण चित्रपटगृहांमध्ये तो चित्रपट अजिबातच चालला नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यानंतरची दोन-तीन वर्ष पूर्णपणे नैराश्यात गेली. त्यानंतर मी लग्नाचा निर्णय घेतला आणि अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली.
या दरम्यान देखील गश्मीरच्या आयुष्यात अनेक गोष्टी आणि अडथळे समोर आले, मात्र यात आई, बहिण आणि बायकोने खंबीरपणे साथ दिल्याचं तो सांगतो.
संबंधित बातम्या