बॉलिवूडमधील हिट चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता आणि प्रसिद्ध डान्सर शांतनु माहेश्वरीची फसवणूक झाली आहे. त्याचे बँकेचे खाते हॅक करुन नवे कार्ड तयार करण्यात आले. त्यासाठी कोणताही ओटीपी मागण्यात आला नव्हता. घडलेला प्रकार अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितला आहे.
शांतनूने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने घडलेला प्रकार सांगितला आहे. ‘धक्कादायक! माझ्या ॲक्सिस बँक अकाऊंटमध्ये फसणवूक झाली आहे. माझ्या कोणत्याही माहितीशिवाय कार्ड जनरेट करण्यात आले आहे. त्याचा कोणताही ओटीपी मला आला नव्हता. इतकेच नव्हे तर कोणत्याही व्हेरिफिकेशनशिवाय माझा ई-मेल आयडी आणि फोन नंबर बदलण्यात आला आहे. माझ्या अकाऊंटची सुरक्षा परत करण्यासाठी त्वरित कारवाई करावी आणि यातून तातडीने मार्ग काढावा’ या आशयाची पोस्ट शांतनूने केली आहे. सोबतच त्याने ही पोस्ट मुंबई पोलीस, मुंबई सायबर पोलीस आणि ॲक्सिस बँकेला टॅग केली आहे.
वाचा: ‘येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओम येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ मालिकेत
सध्या सोशल मीडियावर शांतनूची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एका यूजरने ‘याआधीही असे स्कॅम झाले आहेत. बँकेकडून आणि पोलिसांकडून कारवाई व्हावी’ अशी कमेंट केली. तर दुसऱ्या एका यूजरने ‘यात बँकवाल्यांचा समावेश आहे. त्याशिवाय हे शक्य नाही’ असा संशय व्यक्त केला आहे.
शांतनुच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याने व्ही चॅनेलवरील ‘दिल दोस्ती डान्स’ या शोमधून टीव्ही विश्वात पदार्पण केले. त्यानंतर २०१७मध्ये तो ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 8’मध्ये सहभागी झाली. या शोचे विजेतेपद त्याने पटकावले. शांतनू हा एक प्रसिद्ध डान्सर आहे. त्याने ‘झलक दिखला जा 9’ आणि ‘नच बलिये 9’मध्येही भाग घेतला होता. या दोन्ही शोमध्ये तो फिनालेपर्यंत पोहोचला होता. शांतनु हा ‘देसी हॉपर्स’ या डान्स ग्रुपचा सदस्य असून तो 2015 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये पार पडलेल्या ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ चॅम्पियनशिपचा विजेता ठरला होता.
शांतनूने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्याने नेटफ्लिक्सवरील 'टूथ परी' या सीरिजमध्ये काम केले. ही सीरिज एका वेगळ्या विषयावर असल्यामुळे चर्चेचा विषय ठरली होती. आता लवकरच तो नीरज पांडे दिग्दर्शित ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो अजय देवगण आणि तब्बू या जोडीसोबत काम करणार आहे.