चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. 'वीराना' चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गंगू रामसे यांचे आज (७ एप्रिल) निधन झाले आहे. गंगू रामसे हे गेल्या काही दिवसांपासून आजारीच होते. आजारपणामुळेच गंगू रामसे यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, याच ठिकाणी उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून सिनेदिग्दर्शक गंगू रामसे यांची तब्येत बिघडली होती आणि आता त्यांनी वयाच्या ८३व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. गंगू यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते गंगू रामसे यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
रामसे ब्रदर्स माहित नाही, असे कदाचित क्वचितच कुणी असेल... ‘रामसे ब्रदर्स’ हे भयपटाचे दुसरे नाव होते. गंगू रामसे हे रामसे ब्रदर्सपैकी एक होते. त्यांना ८० आणि ९०च्या दशकात हॉरर चित्रपटांचे बादशाह मानले जात होते. गंगू रामसे हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि सिनेमॅटोग्राफर होते. गंगू रामसे यांचे वडील देखील एफ. यु. रामसे हे देखील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता होते.
गंगू रामसे यांनी इंडस्ट्रीत आपली छाप सोडली होती. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट आणि इंडस्ट्रीतील त्यांचे योगदान कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहील. जेव्हा जेव्हा सिनेमाच्या ८०-९०च्या दशकाविषयी बोलले जाईल, तेव्हा भयपटांचे बादशाह म्हणून गंगू रामसे यांचे नाव नक्कीच घेतले जाईल.
गंगू रामसे यांनी असे अनेक चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत, जे कायम लोकांच्या लक्षात राहतील. गंगू रामसे यांच्या चित्रपटांच्या यादीत 'वीराना', 'दो गज जमीन के नीचे', 'पुराना मंदिर', 'सामरी', 'पुरानी हवेली', 'खोज', 'तहखाना' या चित्रपटांचा समावेश आहे. प्रेक्षकांना त्यांचे चित्रपट खूप आवडायचे. गंगू रामसे यांच्या चित्रपटांबद्दल बोलताना लोक असेही म्हणायचे की, त्यांचे चित्रपट कोणीही एकटे पाहू शकत नाही. कारण रामसे ब्रदर्स हे भयपटाचे दुसरे नाव आहे.
संबंधित बातम्या