Ganesh Chaturthi Marathi Celebrity: देशभरातील भक्तांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडेच गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. सगळेच बाप्पांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच कलाकारांच्या घरी देखील गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जल्लोषात सुरू आहे. मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणारे कलाकार सेटवर तर बाप्पाचे स्वागत करतातच. पण, काही कलाकार या निमित्ताने आपल्या घरी आणि गावी देखील जातात. आता ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतील महाराष्ट्राचा लाडका अभिनेत्या अक्षय म्हात्रे याने गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता व्यक्त केली आहे.
'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेतील 'आकाश' या भूमिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता अक्षय म्हात्रे याने आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या साज-शृंगार आणि या वर्षातील खास गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा लाडका सण असून, अक्षय म्हात्रे यांच्यासाठी हा सण खास असतो.
अक्षय म्हात्रे आपल्या गणेशोत्सवाच्या आठवणी सांगताना म्हणाला, ‘बाप्पाची स्थापना आधी आमच्या गावी अलिबागला व्हायची आणि आम्ही दरवर्षी गावी जायचो. पण, जसजसं आजी-आजोबांचं वय होत गेलं, तसं गावी प्रवास करणं, तिथे जाऊन तयारी कारण थोडं कठीण होत गेलं. कोव्हिडच्या काळात आम्ही ठरवले की, गणपती बाप्पाला मुंबईच्या घरी स्थापित करायचं. तेव्हापासून आम्ही गणेश स्थापना आमच्या नेरुळच्या घरी करायला सुरुवात केली. हे आमचं चौथं वर्ष आहे. हे वर्ष खास आहे, कारण लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे. मी तर खूप खुश आणि उत्साही आहेच पण माझी बायको माझ्यापेक्षाही उत्सुक आहे. तिची तयारी सुरु आहे.
यंदाच्या तयारी विषयी सांगताना अभिनेता म्हणाला, ‘माझी आणि माझ्या पत्नीची, आमची रोज चर्चा होते सजावटीवर, नैवेद्य काय ठेवायचा यावर आणि तिने मला आरती शिकवायला सांगितली आहे. घरी खूप उत्साहाचा माहोल आहे. आई-बाबा जाऊन बाप्पाची मूर्ती बुक करून आले आहेत. आमच्या घरी बाप्पा लालबागच्या गणपतीच्या रूपात येतात. लहानच मूर्ती असते, पण रूप त्याच लालबागच्या राजाचे असते. मला गणेशोत्सवात जी गोष्ट आवडते, ती म्हणजे सगळा मित्र परिवार एकत्र येतो. आमच्या घरी दीड दिवस गणपती असतो आणि त्या दिवसात झोप हा प्रकारचं नसतो. दिवसभर कोणतरी दर्शन करायला येतंच असतात. घर एकदम गजबजलेलं असतं. पाहुण्यांसोबत गप्पा-टप्पा, खेळ- खेळले जातात, गाणी गायली जातात. मला मोदक खायला प्रचंड आवडतात. तूप घालून तर त्याची मज्जा वेगळीच आहे. घरी पूर्ण धमाल वातावरण असतं. आमच्या 'पुन्हा कर्तव्य आहे' च्या सेटवर म्हणजे मालिकेमध्ये ही गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. या दरम्यान मालिकेत खूप काही घडणार आहे. सेटवर पण उत्साहाचा माहोल असणार आहे. तर ती ही वेगळी मज्जा असणार आहे.’