Gandhi Godse Controversy : यामुळे लोकांचा विश्वास उडतोय! ‘गांधी गोडसे’ वादावर एआर रहमान पहिल्यांदाच बोलला...
Gandhi Godse Controversy: गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचे संगीतकार एआर रहमान यांनी देखील पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे.
Gandhi Godse Controversy : बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माते राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट आज (२६ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्याआधीच यावरून अनेक वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. या वादावर ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचे संगीतकार एआर रहमान यांनी देखील पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. या प्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे ‘बॉयकॉट’चे बळी ठरत असल्याचे एआर रहमान यांनी म्हटले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एआर रहमान म्हणाले की, 'लोकांनी चित्रपट पाहिला नाही, त्यांनी ट्रेलर पाहून गृहीत धरले आहे की, हा चित्रपट एकतर्फी आहे. लोकांनी चित्रपट निर्मात्यांवर विश्वास ठेवणे सोडले आहे, कारण त्यांना वाटते की, चित्रपट निर्माते पक्षपाती आहेत, आणि एकच बाजू घेऊन ते चित्रपट बनवतात. म्हणूनच दुर्दैवाने या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील या द्वेषाला बळी पडत आहे. या अशा गोष्टींमुळे लोकांचा विश्वास उडत चालला आहे.’
काही दिवसांपूर्वीच राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. काही लोकांकडून आपल्याला धमकावले जात असल्याचे त्यांनी या पत्रात लिहिले होते. यानंतर पोलिसांनी देखील त्यांना सुरक्षा पुरवली आहे. राजकुमार संतोषी यांनी सुरक्षा पुरवल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.
राजकुमार संतोषी म्हणाले की, ‘गांधी आणि गोडसे दोघेही निर्भय लोक होते. गांधींच्या हत्येनंतर होणाऱ्या परिणामांची गोडसेंना भीती वाटत नव्हती. या दोन बेधडक लोकांवर चित्रपट बनवताना मला भीती कशी वाटेल? मला जीवे मारण्याच्या धमक्यांची पर्वा नाही. पण, माझ्या जवळच्या मित्रांचा आग्रह आहे की, मी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यामुळे मी मुंबई पोलिसांना सुरक्षेची विनंती केली आणि त्यांनी ती मला पुरवली. मी त्याचा आभारी आहे.’
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विरोधाभासी विचारसरणीचे चित्रण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्मात्यांनी या विषयावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाला एआर रहमान संगीत देणार असून, ‘संतोषी प्रॉडक्शन’च्या मनिला संतोषी निर्मित, हा चित्रपट आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.