Priyaka Chopra Struggle Days : ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. प्रियांका आतापर्यंत अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये झळकली आहे. २०००मध्ये 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकणाऱ्या प्रियांकाला बॉलिवूडमध्ये नशीब चमकावणं सोपं नव्हतं. तिच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा तिला मुंबई सोडून आपल्या घरी परतायचं होतं. यामागचं कारण होतं तिच्या नाकाची शस्त्रक्रिया. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला अनेक चित्रपटांतून काढून टाकण्यात आले होते. शिवाय तिला काम मिळणेही बंद झाले होते. या काळात ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रियांकाला साथ दिली होती.
‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकतीच सिद्धार्थ कन्नन यांना मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. यावेळी अनिल यांनी सिद्धार्थशी त्यांच्या चित्रपटांबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी ते प्रियांकाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा तिच्या शस्त्रक्रियेबद्दल ऐकले तेव्हा मला वाटले की, ती ज्युलिया रॉबर्ट्ससारखी दिसेल. त्याबद्दल मी तिला ओरडलो होतो. पण त्यावेळी मला संपूर्ण सत्य माहित नव्हते. नंतर कळले की, तिला नाकाचा त्रास आहे, हे वैद्यकीय ऑपरेशन होते जे चुकले होते. यात प्रियांकाचा दोष नव्हता.’
अनिल म्हणाले की, 'प्रियांका आपल्या कुटुंबासह बरेलीला परतण्याच्या मार्गावर होती. 'द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटासाठी मी तिला पाच लाख रुपयांची टोकन मनी आधीच दिली होती, जी ती परत करायला आली होती. तिने सांगितले की, तिला अनेक चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आले आहे आणि ती आता बरेलीला परत जात आहे. तिच्या वडिलांनी लष्करात पुन्हा ड्युटी सुरू केली होती आणि तिच्या आईने पुन्हा वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू करण्याचा विचार केला होता. त्यावेळी मी तिला म्हणालो की, हे तू पैसे ठेव आणि मी तिला थोडा दमही भरला. मग तिने मला तिच्या नाकाला नेमकं काय झालं ते सांगितलं.'
अनिल पुढे म्हणाला की, ‘तिचं बोलणं ऐकल्यानंतर मी वायआरएफमध्ये काम करणाऱ्या एका प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टला फोन केला आणि प्रियांकाचे नाक दुरुस्त करण्यास मदत करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी नीता लुल्ला यांच्यासोबत तिच्या पूर्ण लूकवर काम केले आणि त्यानंतर अनिल यांनी स्क्रीन टेस्ट घेतली.’ प्रियांकाने अनिल शर्मा यांच्या 'द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा आणि अमरीश पुरी यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली होती.
संबंधित बातम्या