Gadar 2 Box Office Collection Day 9: सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि सगळेच चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. खूप दिवसांनी हे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले आहे. यामध्ये सनी देओलच्या 'गदर २'ने पहिल्या आठवड्यातच तिकीट खिडकीवर २०० कोटींहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. ‘गदर २’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.
‘गदर २’ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी ३०० कोटींचा टप्पा पार केला. त्याचबरोबर शनिवारचा कलेक्शन आकडाही जबरदस्त आहे. 'गदर २' रिलीज होऊन आता ९ दिवस उलटले आहेत. मात्र, इतके दिवस उलटूनही लोकांची चित्रपटाविषयीची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे पाहून याचा अंदाज येत आहे.
प्रेक्षकांचा उत्साह ज्याप्रकारे टिकून आहे, ते पाहता दुसरा आठवडाही पहिल्या आठवड्याप्रमाणेच दमदार कलेक्शन जमवणारा असणार आहे. या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच रिलीजच्या ८व्या दिवशी २०.५० कोटींची कमाई केली. त्याचबरोबर ९व्या दिवशी या चित्रपटाने जवळपास ३५ कोटींचा व्यवसाय केला आहे. यासोबतच चित्रपटाचे कलेक्शन आता ३३५ कोटींवर पोहोचले आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
आता ‘गदर २’ या चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहता, रविवारी देखील हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी हा आकडा ३५० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. शाहरुख खानच्या ' ‘पठान’नंतर सनी देओलचा 'गदर २' या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट 'पठान'चा रेकॉर्ड मोडतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अद्याप ३५० कोटींचा टप्पा पार केलेला नाही. पण, जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ४०० कोटींकडे दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ‘ गदर २’ने जगभरात ३९५.१० कोटींची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या