मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा रहस्यमय अध्याय सुरू करण्याची तयारी चालू झाली आहे. एक नवं कोरं रहस्यमय कथानक घेऊन'गारुड'हा मराठी चित्रपट २५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही काळापासून मराठी मनोरंजन विश्वात सायफाय आणि थरारपट यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगळ्या आणि हटके कथानक असणाऱ्या या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसतेय. यातच आता ‘गारुड’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे, ज्याने सगळ्यांचीच आतुरता वाढवली आहे.
'गारुड'हा चित्रपट प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जाणार आहे, जिथे स्वप्ने,रहस्य आणि वास्तव यांची सरमिसळ होऊन एक नवी दुनिया उभी राहते. चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहतानाच प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.'अंधारल्या रातीचं गारुड,भिजलेल्या रातीचं गारुड'ही टॅगलाईन चित्रपटाच्या कथानकाकडे आपले लक्ष वेधून घेते.
चित्रपटाचे नाव'गारुड'असल्याने आणि मोशन पोस्टरमध्ये रात्रीच्या वीजा चमकत असताना ‘गारुड’ हे नाव लाल अक्षरात दाखवले असल्याने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काहीजणांचे मत आहे की,हे या चित्रपटातील मुख्य पात्राशी सबंधित असावे आणि ते एखाद्या रहस्यमय शोधात असावे. तर काहीजणांचे मत आहे की, या चित्रपटातील एक प्रतीक असावे. "अंधारल्या रातीचं गारुड, भिजलेल्या रातीचं गारुड", असं म्हणत काळोखातील प्रकाशाच्या शोधातील हे 'गारुड' चित्रपटाचे मोशन पोस्टर अधिकच उत्सुकता वाढवत आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.'गारुड'हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक नवीन प्रयोग असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.
दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, ‘गारुड’ हा चित्रपट काल्पनिक असला तरी त्याची कथा आपल्या आजच्या वास्तविकतेशी जोडलेली आहे. प्रत्येक पात्र इतर पात्रांसोबतच्या संवादातून आपल्या शोधाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. या चित्रपटातून प्रेक्षक एक वास्तविक अनुभव घेतील.’
‘गारुड’ या चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर यांनी लिहिली असून, ओंकार संगोरम यांनी चित्रपटाचे संगीत दिले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ध्रुव दास,तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी पेलली आहे. चित्रपटाच्या कलाकारांची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र,लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.'किमयागार फिल्म्स', 'एल एल पी'आणि'ड्रीमव्हीवर'निर्मित आणि'सनशाईन स्टुडिओ'प्रस्तुत'गारुड'हा चित्रपट २५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.