मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Friend Request: एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट'ने बदलेल का ‘त्या’ चौघांचे आयुष्य? अजय पुरकर यांच्या नाटकाने वाढवली उत्सुकता!

Friend Request: एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट'ने बदलेल का ‘त्या’ चौघांचे आयुष्य? अजय पुरकर यांच्या नाटकाने वाढवली उत्सुकता!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 25, 2024 12:52 PM IST

Friend Request Marathi Natak: सोशल मीडियावर आलेली एखादी अनोळखी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकू शकते. याच आशयाचं ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Friend Request Marathi Natak
Friend Request Marathi Natak

Friend Request Marathi Natak: सध्या मराठी रंगभूमीवर देखील अनेक नवनवीन प्रयोग घडताना दिसत आहेत. अनेक नव्या नाटकांनी रंगमंचावर एन्ट्री घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा विडा उचलला आहे. आता एका वेगळ्या आणि हटके विषयावरचं एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय पुरकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकाचं नाव 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' असं आहे. या नाटकातून सध्याच्या तरुणाईचा आणि त्यांच्या वाढत्या सोशल मीडिया वापरावर भाष्य केलं जाणार आहे.

सध्याच्या घडीला सोशल मीडिया विश्वातील फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कधी अशीच आलेली एखादी अनोळखी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकू शकते. याच आशयाचं ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकातून अभिनेते अजय पुरकर पुन्हा एकदा रंगभूमीवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. अभिनेते अजय पुरकर यांच्यासोबतच अभिनेता आशिष पवार, अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, अभिनेते अतुल महाजन यांच्या या नाटकात मध्यवर्ती भूमिका आहेत.

Arun Govil: अयोध्येत जाऊनही रामलल्लाचे दर्शन मिळाले नाही! टीव्हीचे ‘श्रीराम’ अरुण गोविल झाले नाराज

या नाटकाचे लेखन प्रसाद दाणी यांनी केले असून, कुमार सोहोनी दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेते अजय पुरकर, आकाश भडसावळे तसेच शैलेश देशपांडे, वैशाली गायकवाड हे या नाटकाचे निर्माते आहेत. एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' ने चौघांचं आयुष्य कसं बदलत जातं, हे दाखवतानाच नात्यांचे वेगवेगळे कंगोरे आणि बंध यांचा उलगडा करणारं 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे सस्पेन्स, इमोशनल, कॉमिक अशा विविध मिश्रणाचं असणार आहे. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग येत्या २५ जानेवारीला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ५.०० वाजता, तर २६ जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री ९.३० वाजता होणार आहे. १ फेब्रुवारी दुपारी ३.३० वाजाता श्री शिवाजी मंदिर,दादर येथे या नाटकाचा शुभारंभ होईल.

मनोरंजन विश्वातल्या काही दिग्गज मंडळींसोबत आजच्या पिढीचं नाटक करण्याची संधी मिळाल्यामुळे या नाटकाची निर्मिती आणि अभिनय अशा दोन्ही बाजू सांभाळल्याचं अभिनेते अजय पुरकर म्हणाले. दुधारी शस्त्र असलेल्या सोशल माध्यमाचा वापर आपण कशाप्रकारे करतो? हे सध्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतंय. एखादी आलेली 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकते का? याची झलक दाखवणारं हे नाटक आहे. 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे नाटक रसिकांना सुरेख अनुभव देईल, असा विश्वासही अजय पुरकर यांनी व्यक्त केला आहे.

WhatsApp channel

विभाग