छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून 'द कपिल शर्मा शो' पाहिला जायचा. आता हा शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना दिसत आहे. दरम्यान, कॉमेडियन कपिल शर्माने केलेल्या विनोदावर डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी कुस्तीपटू सौरव गुर्जरने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. हा वाद एका एपिसोडमधून उद्भवला आहे ज्यात कपिलने रणबीर कपूरसोबतचा फोटो वापरून सौरवची खिल्ली उडवली होती.
'द रिच' या युट्यूब चॅनेलने नुकत्याच दिलेल्या पॉडकास्टमध्ये सौरवने कपिलचे विनोद दिशाभूल करणारे असल्याचा आरोप केला आहे. पोस्ट का पोस्टमॉर्टेम नावाच्या सेक्शनमध्ये कपिलने सेलिब्रिटींच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर टाकलेल्या कमेंट्स वाचल्या. या एपिसोडमध्ये कपिलने सौरवचा रणबीरसोबतचा एक फोटो उचलला आणि कमेंट केली, ज्यात लिहिले होते की, "लगता है, रणबीरने नई गाड़ी ली है बी एम बबलू (असे दिसते की रणबीरने बीएम बबलू नवीन कार खरेदी केली आहे)."
या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना सौरव म्हणाला की, "आम्ही सर्वजण मानतो की कपिल फोटोमध्ये वाचलेल्या सर्व कमेंट्स सत्य आणि वास्तविक आहेत... पण तसे होत नाही. माझा आणि रणबीरचा एक फोटो होता... त्यांनी बी एम बबलू टिप्पणी वाचली आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक विनोद केला, जेव्हा मला याबद्दल कळले तेव्हा मला ते आवडले नाही."
"मी टिप्पणी पाहण्यासाठी पुन्हा फोटो पाहाली. त्यावरच्या कमेंट वाचल्या आणि मला कपिलने वाचलेली कमेंट सापडली नाही. मला शोमध्ये बोलावण्यात आले तेव्हा त्याच्या टीमने फोटोवर कमेंट करण्यास सुरुवात केली. मला हा सगळा प्रकार आवडला नाही आणि केवळ हसण्यासाठी खोट्या कमेंट्सचा वापर केला जात आहे" असे सौरव म्हणाला.
कपिल शर्माच्या एका एपिसोडमध्ये रणबीर कपूर हा अनुभव सिंग बस्सीसोबत तू झूठी मैं मक्करच्या प्रमोशनसाठी आला होता. हा शो द कपिल शर्मा शो सीझन २ चा भाग होता आणि मार्च २०२३ मध्ये प्रसारित झाला होता. रणबीरचे इन्स्टाग्राम पेज नसल्याने कपिलला वेगवेगळ्या अकाऊंटवरून त्याचे फोटो मिळाले. कपिलने सुरुवातीला सौरव गुर्जर हा त्याचा ट्रेनर आहे का, अशी विचारणा केली, पण रणबीरने तो त्याचा को-स्टार असल्याचे उत्तर दिले. या फोटोत सौरव गुर्जर रणबीरला पाठीवर उचलताना दिसत आहे.
वाचा: फाटलेले कपडे घालून कंटाळलो होतो; विक्रांत मेसीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
सौरवने कपिलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली होती. "तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात @KapilSharmaK9 तुम्ही लोकांना हसवता. पण तुम्ही आणि तुमची टीम एखाद्याच्या सोशल मीडियावर या खोट्या टिप्पण्या कशा दाखवू शकता. हे मान्य नाही" असे सौरव म्हणाला. या प्रकरणी कॉमेडियनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.