Lai Suk Yin Death: हाँगकाँगची माजी अभिनेत्री बोनी लाई सुक-यिन हिचे २६ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. ४६ वर्षीय अभिनेत्रीने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. बोनी लाई सुक-यिन हिच्या अकाली निधनाची पुष्टी तिचा माजी पती-अभिनेता केनेथ लो यांनी केली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने २६ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. या बातमीने अभिनेत्रीच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. आत्महत्येच्या अवघ्या एक दिवस आधी अभिनेत्रीने आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस अतिशय जल्लोषात साजरा केला होता.
अभिनेत्री बोनी लाई सुक-यिन हिने आत्महत्या करण्यासाठी तिच्या खोलीत कोळसा जाळला होता. या कोळशाच्या धुरामुळे ती गुदमरून बेशुद्ध झाली आणि तिचा जीव गेला. त्यानंतर अभिनेत्रीच्या मुलाने तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी बोनी लाई सुक-यिन हिला मृत घोषित केले. सध्या प्राथमिक तपासात पोलीस आणि डॉक्टरांनी ही आत्महत्या असल्याचे घोषित केले आहे. या बातमीने अभिनेत्रीच्या कुटुंबासह तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
आत्महत्येच्या एक दिवस आधी, अभिनेत्री बोनी लाई सुक-यिनने तिच्या कुटुंबासह हाँगकाँगमध्ये ख्रिसमस साजरा केला होता. या ख्रिसमस सेलिब्रेशनचे अनेक फोटोही तिने सोशल मीडियावर शेअरही केले होते. अशा परिस्थितीत अभिनेत्री बोनी लाई सुक-यिनने उचलेले हे टोकाचं पाऊल सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले आहे की, बोनी लाई सुक-यिन हिने मृत्यूपूर्वी तिचा पती डॉक्टर एंगस हुई यांना एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये आता पुढच्या आयुष्यात ती त्याला भेटेल, असे लिहिले होते. अभिनेत्री बोनी लाई सुक-यिन गेल्या अनेक वर्षांपासून नैराश्याने ग्रस्त होती, असे सांगण्यात येत आहे.
अभिनेत्री बोनी लाई सुक-यिन हिने १९९५मध्ये 'मिस आशिया पेजेंट'मध्ये उपविजेते पदक पटकावले होते. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती. १९९८मध्ये अभिनेत्री बोनी लाई सुक-यिनने, अभिनेता केनेथ लोसोबत लग्न केले होते. या जोडीला दोन मुले आहेत. मात्र, २००६मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २००७मध्ये बोनी लाई सुक-यिनने एंगस हुई ची-चिंगशी लग्न केले. त्या दोघांनाही दोन मुले आहेत.